तीन महिन्यांपूर्वी रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात घडला धक्कादायक प्रकार
आईने पोलिसाकडे केली तक्रार
वडील आणि बाळ खरेदी करणाऱ्या जोडप्यासह एकूण ५ जणांवर दाखल केला गुन्हा
रत्नागिरी | प्रतिनिधी : महिलेच्या पतीसह अन्य चार जणांनी संगनमताने तिच्या दीड महिन्याच्या बाळाची 60 हजार रुपयांना विक्री केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात घडली होती.
यामध्ये विवाहितेचा पती प्रसाद नरेंद्र हातीम (रा.रहेजा कॉम्प्लेक्स मालाड,मुंबई), बाळ खरेदी करणारे दाम्पत्य आज्ञा संतोष माने तिचा पती, संतोष विजय माने (दोन्ही रा.शिवरेवाडी शिरगाव,रत्नागिरी),मयुरी निखिल जाधव (रा.अंधेरी,मुंंबई) आणि अजय जाधव (रा.बदलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सिध्दी प्रसाद हातिम (24, रा.रहेजा रहेजा कॉम्प्लेक्स मालाड,मुंबई) हिने गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,23 फेब्रुवारी 2024 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात या पाच संशयितांनी संगनमताने सिध्दी हातिम यांना धमकी दिली.
त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्याकडून बेकायदेशिर दत्तकविधान पत्रावर सह्या घेउन सिध्दी हातिम यांच्या स्वराज नावाच्या दीड महिन्याच्या बाळाची 60 हजार रुपयांना खरेदी-विक्री केली. त्यानंतर पिडीतेचा पती प्रसाद याने तिला घराबाहेर काढून सोडून दिलेले आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 80,81 भादंवि कायदा कलम 323,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास जाधव करत आहेत.










