दुचाकी चोरीच्या रॅकेटचा होणारा पर्दापाश

राजापूर पोलिसांची मोठ्ठी कामगिरी

शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीपैकी अल्पवयीन तरूणाच्या मुसक्या आवळल्या

दोन चोरीच्या मोटर सायकल जप्त

राजापूर (वार्ताहर): महामार्गावर ओणी येथे दुचारीवरून आलेल्या तरूणांनी शस्त्राचा धाक दाखवून एका चार चाकी वाहनाला थांबवत लुटण्याचा प्रयत्न् अयशस्वी झाल्यानंतर तेथुन पळ काढणाऱ्या दुचाकी स्वारांपैकी एका अल्पवयीन तरूणास अणुस्कुरा जंगलात पकडण्यात राजापूर पोलिसांनी यश मिळविले आहे. त्यांच्याकडून दोन चोरीच्या मोटर सायकल पोलिसांच्या हाती लागल्या असून त्यातून दुचाकी चोरी रॅकेटचा पर्दापाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी तालुक्यातील ओणी येथे काही तरूणांनी मोटार सायकलने येत चारचाकी वाहनाला अडवून आपल्याकडे असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न चालू केला होता. दरम्यान मोठी ओरड व वाहतुककोंडी झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणांनी तेथून पाचल, अणुस्कुरा मार्गे कोल्हापूरकडे पळ काढला.

 

दरम्यान लांजाचे पोलीस उपनिरीक्षक पप्या रेवणे यांनी सुटीवर असतानाही माहीती मिळताच रायपाटण पोलीस दुरक्षेत्राला दुरध्वनीद्वारे माहीती दिली. यावेळी ठाणे अंमलदार म्हणून काम पाहणारे कमलाकर तळेकर यांनी त्वरीत वरीष्ठांशी संपर्क साधून नाकाबंदी केली. अणुस्कुरा चेकपोष्टलाही याची माहीती दिली. तर ग्रामस्थांकडून त्याची माहीती काढण्यास सुरूवात केली. यावेळी सौंदळ येथील स्वप्नील घाग यांनी ते तरूण मोटरसायकर द्वारे येळवण मार्गे अणुस्कुराकडे गेले असल्याची माहीती दिली.

 

त्यामुळे अणुस्कुरा चेकपोस्टवर त्वरीत नाकाबंदी केली. दरम्यान तीघे तरूण मोटार सायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले. मात्र इथे नाकाबंदी असल्याचे पाहून आपण पकडले जाऊ या भितीपोटी त्या तरूणांनी आपल्या ताब्यातील दुचाकी त्याच ठिकाणी सोडून येरडव, अणुस्कुरा घाटातील जंगलात पळ काढला. ते तरूण जंगलात पळाले असल्याची माहीती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी दिनेश माईणकर व राजापूर पोलीस स्थानकांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. त्वरीत हालचाली करीत त्या तरूणाचा शोध घेण्यास सुरूवात केली. आजूबाजूचे जंगलमय परिसरात शोध घेतला असता रात्री १० वाजण्याचे सुमारास त्यातील एक अल्पवयीन तरूणाला ग्रामस्थांच्या सहकार्याने जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले. त्या तरूणांचे नाव आतिष दिलीप गव्हाणे, (वय-16 वर्षे, रा. कोहकडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) असल्याचे पोलिसानी सांगितले. याच्याकडे चौकशी केली असता अन्य दोन्ही साथीदारांची नावे समोर आली. दिपक श्रीमंदिलकर, अजय घेडगे (दोन्ही रा. ता. पारनेर जि. अहमदनगर) हे अद्याप पर्यंत फरार असून त्यांचा येरडव अणुस्कुरा येथील जंगलमय भागामध्ये शोध सुरु असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.

 

ज्या दोन मोटार सायकल सोडून ते तरूण फरार झाले आहेत. त्यापैकी एक मोटार सायकल (एम.एच.46/ए.टी.-2621) ही संगमेश्वर येथून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही मोटर सायकल सुनिल भार्गव सुर्वे (रा.मुचरी, ता.संगमेश्वर) यांच्या मालकीची आहे. मात्र दुसरी मोटर सायकल ही कोणाची हे अद्याप कळू शकले नाही. जंगलात फरार झालेल्या त्या दोन तरूणांचा जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीसांची टीम कसून शोध घेत असून लवकरच या दोन्ही तरूणांना ताब्यात घेतले जाईल असा विश्वास राजापूर पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला.