खेड(प्रतिनिधी) तालुक्यासह ग्रामीण भागात चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा घरांसह शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी दिले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या फळझाडे व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी १६ कृषी सहाय्यकांसह ५ कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सर्वाधिक तडाखा महावितरणला बसला असून २० लाखाच्या आसपास हानी झाली आहे. याशिवाय शहरासह ग्रामीण भागात घरांसह गोठ्यांची पडझड होवून २० लाखाहून अधिक हानी झाली आहे. शहरासह तालुक्यातील सुकिवली, भोस्ते, चाकाळे येथील घरांची सर्वाधिक हानी झाली आहे. अवकाळी पावसामुळे घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मंडल अधिकारी व तलाठी यांना देण्यात आले असून काम देखील सुरू आहे. मात्र अद्याप घरांच्या नुकसानीचा आकडा प्राप्त झालेला नाही.
वादळी वाऱ्याचा तडाखा शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. विशेषतः विशेषतः आंबा बागायतदारांच्या बागायती उद्ध्वस्त होवून मोठी हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने आंबा बागायतदार चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत.
तीन दिवसांपासून सायंकाळ च्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस संततधार पडत असल्याने शेतकऱ्याची चिंता कायम आहे. या पार्श्वभूमीवर फळझाडे व फळबागांच्या पंचनामे करण्यासाठी २१ अधिकारी व कृषी सहाय नियुक्ती करण्यात आले आहे. पंचनाम्याचे काम देखील सहाय्यकांकडून हाती घेण्यात आले आहे









