खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातील प्रवासी व कर्मचाऱ्यांना टँकरच्याच पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. बसस्थानकातील विंधन विहिरीचा पाईप लोखंडी असल्याने तो पूर्णपणे गंजलेला आहे. यामुळे आरोग्यास हानी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बहिरवली येथील सामाजिक कार्यकर्ते व जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेच्या पुढाकारातून २ पाणपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची चिंता मिटली आहे.
येथील बसस्थानक नानाविध समस्यांच्या गर्तेतच अडकले आहे. विशेषत: पाणीप्रश्न गंभीर बनला असून प्रवाशांचे हाल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी मनसेचे शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे व पदाधिकाऱ्यांनी एसटी प्रशासनाला दणका दिल्यानंतर पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस वगळता प्रवाशांच्या पाण्याचा प्रश्न गंभीरच बनला आहे.
कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना टँकरच्या पाण्यावरच तहान शमवावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव व सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्याकडे लेखी पत्राद्वारे विंधन विहिरीला फ्लॅश व एक केशिंग पाईप टाकून देण्याबाबत कळवले होते. तसेच एसटी प्रशासनाने प्रवाशांसाठी २ पिण्याच्या पाण्याचे कुलर देण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्राची दखल घेत बसस्थानकात दोन पाणपोई उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.










