अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

 

मालवण तहसीलदार यांची कर्ली खाडी किनारी तळगाव, आंबेरी परिसरात कारवाई

मालवण | प्रतिनिधी : कर्ली खाडी किनारी तळगाव परिसरातील पेडवे, खांद, म्हावळुंगे तसेच आंबेरी डिचोलकरवाडी, मळावाडी येथे अनधिकृत वाळू उत्खननसाठी उभारण्यात आलेले एकूण 26 वाळूरॅम्प मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने जमीनदोस्त केले आहेत.

तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांसह महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितील पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाच्या पाहाणी दरम्यान काळेथर येथे सुमारे दहा ब्रास अनधिकृत वाळू साठा सापडून आला. हा वाळू साठा सील करण्यात आला असून पुढील कारवाई सूरू असल्याचे मालवण महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.