समाजाच्या नावाने राजकारण करणारे समाजाचा विकास करत नाहीत : सुहास खंडागळे

Politicians in the name of society do not develop society: Suhas Khandagale

रत्नागिरी :  कोकणातील कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संघटना अनेक वर्षे परिश्रम घेऊन जेष्ठ समाजनेत्यांनी उभ्या केल्या. त्या ताब्यात घेऊन त्या संघटनांच्या माध्यमातून स्वतःचे राजकिय अस्तित्व निर्माण करू पाहणारे समाजातील धनदांडगे नेते कुणबी समाजाचा विकास करू शकत नाहीत असे रोखठोक मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे.समाज नेत्यांनी समाजकार्यासाठी कुणबी समाजाच्या सामाजिक,सांस्कृतिक संस्था उभ्या केल्या.या संस्था उभ्या करण्यात अनेक मान्यवर समाजनेत्यांचे योगदान आहे.या संस्थेच्या माध्यमातून समाजाचा वैचारिक,सांस्कृतिक ,सामाजिक विकास अपेक्षित आहे.अनेक विचार धारेचे समाजातील लोकं एकत्र येऊन समाज पुढे नेण्याचे काम आजपर्यंत अशा संस्थांच्या माध्यमातून झाले आहे.मात्र अलीकडे राजकीय महत्वकांक्षा असणाऱ्या काही धनाढ्य लोकांनी या संस्थांवर आपली पकड मजबूत करून त्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा नवा मार्ग शोधला आहे,जो दुर्दैवी आहे असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे.

राजकारण करायचेच असेल तर ते स्वतः जमिनीवर उतरून या नेत्यांनी शून्यातून सुरवात करावी.समाजाच्या नावाने उभ्या असणाऱ्या संस्थांचा वापर आपल्या राजकिय भवितव्यासाठी करू नये.समाजभवन, कुणबी भवनसाठी निधी अशा गोष्टींचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे. समाजाच्या नावाने राजकारण करण्यासारखे शॉर्टकट्स मारल्याने कदाचित तत्कालीन फायदे या नेत्यांना होतील मात्र याचे दूरगामी परिणाम समाजातील पुढील पिढ्यांना भोगावे लागतील याचे भान समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे.ज्या समाजात वैचारिक मोकळीक मान्य होणार नाही तो समाज प्रगती करणार नाही.याशिवाय समाजाचा निवडणुकीत उमेदवार ठरविण्याची जी प्रथा हल्ली सुरू झाली आहे ती घातक आणि समाजातील अन्य गरीब तरुण तरुणींचा राजकिय हक्क डावळणारी आहे.स्वतःच्या कर्तृत्वावर या नेत्यानी आपले राजकारण करायला हवे, समाजाचा वापर राजकारण करण्यासाठी दुर्दैवी असून आज पर्यंत असे राजकारण करणाऱ्यांनी स्वतःच्या पोळ्या भाजल्या ,समाज मात्र तिथेच आहे असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.समाजाच्या नावाने राजकारण होताना अधिक कट्टरता वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात सामाजिक कार्य करण्यासाठी असणाऱ्या संस्था राजकारणासाठी का वापराव्यात असा सवाल देखील सुहास खंडागळे यांनी उपस्थित केला आहे.तरुणांनी यापुढे विकासात्मक राजकारणाकडे वळावे असे आवाहनही खंडागळे यांनी केले आहे