वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहरात भरवस्तीत पिराच्या दर्ग्या जवळील श्रीराम उर्फ शिरी कुडतरकर यांच्या घराच्या मागच्या पडविमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि मागच्या बाजूने धूर येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली तर काही वेळात वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने ही आग पूर्णपणे विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
कुडतरकर यांच्या घराच्या मागच्या बाजूने आगीचा धूर येऊ लागल्याने अक्षय पांगम, भाऊ वालावकर, किरण पवार, निसार माकांनदार, प्रकाश डीचोलकर यांच्यासह नागरिकांनी कुडतरकर यांच्या घरी धाव घेतली आणि मागच्या बाजूने मिळेल तिथले पाणी घेऊन आग वीजवायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळात वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला आणि त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

मात्र आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आगीमुळे मागील बाजूचा काही भाग जळून नुकसान झाले आहे. या घराच्या बाजूला लागून अनेक घरे आहेत. ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.









