खेड(प्रतिनिधी)
येत्या काही दिवसात पावसाळी वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच गुरुवारी संध्याकाळी खेड शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाचा शिडकावा झाला. सायंकाळी झालेल्या वादळात खेडच्या ग्रामीण भागातील खाडीपट्ट्यात वादळ सदृश्य वार्यांनी अनेक झाडे कोसळली.
खाडीपट्ट्यातील तळघर दंडवाडी येथील राकेश बुदर यांच्या घराचे छत उडून गेले. तर हरी नाचरे यांच्या घराचे छत उडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या ठिकाणी अचानक जोरदार वारा सुटला वादळ सदृश वार्याने या परिसरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळुन नुकसान झाले. ऐन उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आंबा-काजूच्या बागा यांचे मोठे नुकसान झाले असून, ऐन आंबा काजूच्या मोसमातच वादळी वार्याच्या तडाखा बसल्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत.
दरम्यान, ऐन मे महिन्यात कोसळू लागलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस, काजू, करवंद, जांभूळ या कोकण मेव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा काजू ही पिके आधीच धोक्यात आली आहेत. त्यात आता पुन्हा अवकाळीचा संकट आले असल्याने हापूस आणि काजूचे नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.










