प्रशासन निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याचा परिणाम, पाणीटंचाईचा प्रश्न बनणार गंभीर
खेड(प्रतिनिधी) तालुक्याला भेडसावणारी पाणीटंचाई तीव्रता कमी करून टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची प्रक्रिया लांबणीवर पडण्याकरिता दरवर्षी विजय बंधारे बांधण्याची मोहीम पंचायत समितीस्तरावर हाती घेण्यात येते. यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासकीय यंत्रणा गुंतल्याने विजय बंधारे बांधण्याचा मुहूर्त हुकला आहे.
ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित कालावधीमध्ये प्रशासकीय पातळीवरून विजय बंधारे बांधण्यासाठी कोणती?पावले उचलली जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजनांचा अवलंब केला जात असला तरी पाणीटंचाई तालुक्याच्या पाचवीलाच पुजल्यासारखी राहिली आहे. याचमुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी करून ग्रामस्थांना काहीअंशी दिलासा देण्याकरिता विजयी बंधारे बांधण्यावर भर दिला जातो. या विजयी बंधाऱ्यांमुळे मुबलक पाणीसाठा निर्माण होवून पाणीटंचाई लांबणीवर पडते.
गतवर्षी जवळपास २१३ विजयी बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांमुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात विजयी बंधारे बांधण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यंदा मात्र या प्रक्रियेत विधानसभा निवडणुकीमुळे खोडा पडला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत गुंतल्याने अद्यापही विजयी बंधारे बांधण्यास मुहूर्त मिळालेला नाही. यामुळे यंदा पाणीटंचाई ग्रामस्थांना रडकुंडीस आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनंतर बंधाऱ्याच्या प्रक्रियेस गती येणे गरजेचे आहे.
पहिला मान देवघर-सोंडे ग्रा. पं. ला
तालुक्यात विजयी बंधारे बांधण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला असला तरी देवघर सोडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत गावातील नदीवर विजय बंधारा बांधत पहिला मान मिळवला आहे. ग्रामस्थांच्या सहभागातून बांधण्यात आलेल्या विजय बंधाऱ्यामुळे नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईची समस्या लांबणीवर पडणार आहे.









