पत्रकार संदेश सप्रे यांचे निधन

Google search engine
Google search engine

Journalist Sandesh Sapre passed away

देवरूख : येथील पत्रकार संदेश सुरेश सप्रे यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे आज बुधवारी दुपारी पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

अनेक विषयांवर विशेषतः राजकीय वृत्तांवर हातखंडा अशी संदेश सप्रे यांची ओळख होती. त्यांचे वडील बंधू समीर सप्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून संदेश सप्रे यांनी पत्रकारितेत प्रवेश केला. त्यांनी दैनिक सकाळसाठी देवरूख येथील बातमीदार म्हणून काम केले. चिपळूण येथेही त्यांनी काही काळ काम केले. तेथील सागर दैनिकात काही काळ उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. देश आणि राज्य पातळीवर घडणाऱ्या विविध घटनांचा कोकणाशी ताळमेळ लावून तातडीने बातम्या देण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. अनेक जुने संदर्भही ते देत असत. राज्याचा आणि केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यात कोकणासाठी काय आहे, याची संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधून माहिती घेऊन ती त्याची बातमी देण्यात संदेश सप्रे आघाडीवर असत. रवींद्र माने, सुभाष बने, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, राजन साळवी, अशा स्थानिक नेत्यांसह नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू अशा अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क होता. केवळ संगमेश्वर तालुका आणि रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर कोकणातील विविध घटनांचा मागोवा घेणारी अनेक वार्तापत्रे त्यांनी लिहिली. विविध संस्था आणि संघटनांशी त्यांचा सततचा संपर्क होता.

महिला बचत गटासंबंधी केलेल्या लेखनासाठी त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला होता. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा दर्पण पुरस्कारही त्यांना मिळाला होता. उपजीविकेचे साधन म्हणून संगमेश्वर आणि देवरूख येथे ते उपाहारगृह चालवत असत.

आपली नियमित तपासणी आटोपून ते पुण्यातून पनवेल येथे आपल्या बंधूकडे गेले होते. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पनवेल येथील अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच मेंदूतील अतिरक्तस्रावामुळे त्यांचे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
संदेश सप्रे यांचा मृतदेह देवधामापूर (ता. संगमेश्वर) येथे आणण्यात येणार असून तेथून उद्या (दि. ६ एप्रिल) सकाळी ७ वाजता अंत्ययात्रा निघेल, असे बंधू चिंतामणी सप्रे यांनी कळविले आहे. संदेश सप्रे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन कन्या, बंधू आणि त्यांचा परिवार आहे.