मालवण | प्रतिनिधी : अरबी समुद्रात मान्सून पूर्व हालचाली सूरू झाल्या आहेत. समुद्रात अशांत स्थिती निर्माण होत असून समुद्राचे पाणी गढूळ व्हायला सुरुवात झाली आहे. सागरी पर्यटन (वॉटर स्पोर्टस) व्यवसायिकांनी नौका व अन्य साहित्य किनाऱ्यावर घेतले असून मच्छीमारांनी सुध्दा मासेमारी नौका सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे.
शासनाने अगोदरच जाहीर केल्या प्रमाणे जलक्रीडा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बंद करण्यात आले आहे. पावसाळी कालावधीसाठी ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्या दर्शनही पर्यटकांसाठी बंद झाले आहे. समुद्रातील जलक्रीडा प्रकार रविवार पासून बंद झाली आहे.
अरबी समुद्रात मान्सून पूर्व हालचाली दिसून येत आहेत. समुद्राच्या पाण्याचा प्रवाह आणि पाण्याचा रंग बदलला आहे. हे मान्सूनच्या आगमनाचे संकेत आहेत असे बोलले जात आहे. १ जून पासून समुद्रातील मासेमारीही बंद होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी आपल्या मासेमारी नौका किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे. काहींनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी हलविल्या आहेत.











