तुये गावात बिबट्याकडून कुत्र्याचा फडशा

स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण

पेडणे : निवृत्ती शिरोडकर

भोमवाडा-तुये येथील चंदन नाईक यांच्या घराबाहेर बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. पेडणे तालुक्यात गावागावांमध्ये बिबट्याचा संचार वाढलेला असून चार दिवसापूर्वी परिसरात पाळीव जनावरावर हल्ले केले आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

तुये येथे काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चंदन नाईक यांच्या मालकीच्या घराच्या गॅलरीमध्ये पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. कुत्रा साखळीने बांधला गेल्यामुळे त्याला वाघाला नेता आले नाही. परंतु वाघाने त्या कुत्र्याचा जीव घेतला. मागच्या दोन महिन्यापूर्वी असेच तुये परिसरात एका कुत्र्यावर हल्ला केला होता. तसेच दोन चार कुत्र्यावर हल्ले करून वाघाने आपला संचार वाढवला होता. मागच्या वर्षी बिबट्याने तुये देऊळवाडा येथून पार्से येथील युवक कामावरून येताना त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात तो युवक जखमी झाला होता. या बिबट्या वाघांचा बंदोबस्त करावा अशी नागरिक मागणी करत आहे. परंतु अजून पर्यंत वनखात्याला यश आलेले नाही.

पेडणे तालुक्याचा विचार केला तर मागच्या दहा ते बारा वर्षांपूर्वी चांदेल, हसापूर, इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण, पत्रादेवी, कासारवर्णे, हाळी या भागात जंगलातील हत्ती लोग वस्तीत घुसून शेताची बागायतीची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असे. मोठ्या प्रमाणात केळीची नुकसानी करायचे. त्यांच्या मागून आता गवे रेडे यांनी आपला मोर्चा लोक वस्तीत वळवला आहे.