खेडमध्ये आणखी ६ वाड्या तहानलेल्या

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यात पाणीटंचाईने अक्षरशः कहर केला असून १७ गावातील ४४ वाड्यांमध्ये १ शासकीय व १ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. तालुक्यातील आणखी ६ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली असून येथील ग्रामस्थ अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रशासनाकडून दाखलाच प्राप्त न झाल्याने या वाड्यांतील ग्रामस्थाची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही.

तालुक्यातील खोपी – अवकिरेवाडी, मानेवाडी, सवणस-मूळगाव, देऊळवाडी, नाभिकवाडी, वरचीवाडी, खालचीवाडी येथील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करूनही अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसदी प्रशासनाने न घेतल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. एकीकडे रणरणत्या उन्हाने ग्रामस्थांना घाम फुटत असताना त्यात पाणीटंचाईचे चटके असह्य झाल्याने ग्रामस्थ हताश झाले आहेत. त्यातच प्रशासनाकडे अजूनही अवघे दोनच टँकर उपलब्ध असल्याने तहानलेल्या गाव- वाड्यांना बऱ्याचवेळा टँकरची प्रतीक्षाही करावी लागत आहे.