खेड(प्रतिनिधी) खेड नगर प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच मान्सूनपूर्व कामे हाती घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत गटरांची स्वच्छता केली. मात्र, नालेसफाई नंतरही गटारे व कचऱ्याने तुंबलेलीच असल्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केवळ नाले सफाईचे सोपस्कार पार पाडले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपलेला असताना अजूनही नगरप्रशासनाने परिपूर्ण नालेसफाई न केल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन
करावा लागत आहे.
येथील नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी गटारांची स्वच्छता केली. मात्र, सद्यस्थितीत गटरांमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्ससह कचऱ्याचा खच निदर्शनास येत असून पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्याने गटारे तुंबली आहेत.
याशिवाय बऱ्याच ठिकाणी सांडपाणी देखील रस्त्यावर वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य परसले आहे. पोलीस स्थानक परिसरातील गटारांचीही हीच अवस्था असून तहसील कार्यालय व पोलीस स्थानकात दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. तुंबलेल्या गटारांची परिपूर्ण स्वच्छता करण्यासाठी नगरप्रशासनाला सवड मिळणार तरी कधी, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील तळ्याचे वाकण येथील गटार पूर्णपणे तुंबले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.याशिवाय महाडनाका परिसरात देखील हीच परिस्थिती कायम आहे











