जामसंडेत घरावर वीज कोसळली 

झाला स्फोटसारखा आवाज ; १ लाख ७५ हजाराचे नुकसान

देवगड : देवगडमध्ये गुरुवारी सकाळी ढगांच्या गडगडात व विजांच्या कडकडाटासह आगमन झालेल्या पावसाने सुरुवातीला चांगला दणका दिला. जामसंडे टिळकनगर येथे घरावर वीज पडली या घटनेत घरातील सर्व विद्युत उपकरणे, वायरिंग जळून सुमारे १ लाख ७५ हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १०:३० वा सुमारास घडली. सुदैवाने घरातील कोणालाही दुखापत झाली नाही.

उकड्याने त्रस्त असलेल्या देवगडवासियांना गुरुवारी पावसाने हजेरी लावून सुखद दिलासा दिला. मात्र ढगांच्या गडगडाटाने व विजांच्या कडकडाटाने आगमन केलेल्या पावसाने सुरुवातीला चांगला फटका दिला. गुरुवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने जामसंडे टिळकनगर येथील मंदाकिनी मोहन मयेकर यांच्या घरावर वीज पडून सुमारे १ लाख ७५ हजाराचे नुकसान झाले . मयेकर या मुलासमवेत घरात राहत होत्या. सकाळी १०:३० वा वीज पडल्याने त्याच्या दणका घराच्या सीलिंगला तसेच वायरिंग व विद्युत उपकरणे यांना बसला.

यादरम्यान स्वयंपाक घरात काम करीत असलेल्या मंदाकिनी मयेकर या विजेच्या स्पार्किंगमुळे किचनमध्येच बाजूला फेकल्या गेल्या. सुदैवाने त्यांना कोणतेही दुखापत झाली नाही या प्रसंगातून त्यांनी सावरत प्रथम बेडरूममध्ये असलेल्या त्यांचा मुलगा सागर याला हाक मारून तो सुखरूप असल्याची खात्री केली व त्यानंतर वीज पडल्यामुळे घरात काय नुकसान झाले हे पाहिले. वीज पडल्यानंतर स्फोटसारखा आवाज झाला यामुळे आजूबाजूचे नागरिकही भयभीत झाले होते.विजेच्या प्रचंड धक्क्याने घरातील पूर्णतः वायरिंग जळाली. विद्युत उपकरणेही जळून गेली.वायरिंगच्या पट्ट्या तुटून लोंबकळत होत्या. इलेक्ट्रिक पॉईंट असलेल्या ठिकाणच्या बाजूनेही नुकसान झाले. तसेच सिलिंगच्या छताचेही काही प्रमाणात नुकसान झाले. घडलेल्या घटनेबाबत मयेकर यांच्या शेजारी घर असलेल्या संतोष मेस्त्री यांनी प्रथम माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांना फोन करून या घटनेची माहिती दिली.चांदोसकर यांनी तात्काळ एमएससीबी,महसूल विभाग, पोलीस, नगरपंचायत यांना कळविले व स्वतः तसेच स्थानिक नगरसेविका सौ तन्वी चांदोसकर यांनी मयेकर यांच्या घरी येऊन त्यांना प्रथम धीर दिला. व घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती घेऊन संबंधित यंत्रणा यंत्रणेतला तात्काळ कळविले.

देवगड पोलीस व तलाठी एस बी डांगे यांनी प्रथम घटनास्थळी मयेकर यांच्या घरी जाऊन नुकसानीची पाहणी केली .यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर नगरसेविका तन्वी चांदोस्कर उपस्थित होते. चांदोस्कर यांनी घरातील वायरिंग व वीज उपकरणे जामसंडे येथील इलेक्ट्रिशियन अभिजीत रानडे यांना बोलावून घेतले. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून घरामधील नुकसान झालेल्या वीज उपकरणे व वायरिंग याबाबतची यादी तयार करून दिली. त्यानंतर पंचनामा करण्यासाठी आलेले मंडल अधिकारी दीपक पावसकर व तलाठी डांगे यांच्याकडे यादी देण्यात आली. घरातील वीज पडून झालेल्या नुकसानीचा पूर्ण पंचनामा करण्यात आला.

यावेळी घराच्या सिलिंगचे झालेले नुकसान, वीज पडल्यामुळे घराच्या काही बांधकामाचे झालेले नुकसान, घरातील सर्व वायरिंग ,इलेक्ट्रिक उपकरणे ,यामध्ये फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन,पंखे, आदींचे सुमारे १ लाख ७५ हजार नुकसान झाले याची माहिती तलाठी श्री डांगे यांनी दिली. या घटनेनंतर जामसंडे टिळकनगर येथील निनाद देशपांडे,तेजस देशपांडे यांनीही घटनास्थळी जाऊन सहकार्य केले.