मेर्वीतील पुजाऱ्याला राजस्थान, पंजाबमधील तिघांनी फसवले
रत्नागिरी ः प्रतिनिधी
ऑनलाईन फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तिघांनी मेर्वी येथील पूजार्याची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 27 फेबु्रवारी 2023 ते 29 जून 2023 या कालावधीत घडली आहे.
अजयकुमार आर्या,सौरभ चावला (दोन्ही रा. गंगानगर राजस्थान) आणि राजिंदर कुमार (रा.वर्यम खेडा,फजिल्का,पंजाब) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात समीर वसंत पाध्ये (57,रा.मेर्वी,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, या तीन्ही संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने फिर्यादीला फॉरेक्स मार्केट या कंपनीच्या अकाउंटला वॉलेट अॅड्रेसवर पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यावर दरमहा 10 टक्के परतावा देतो असे आमिष दाखवले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत फिर्यादींनी पैसे भरले. परंतू कोणताही परतावा न मिळाल्याने फिर्यादीने संशयितांना वेळोवेळी फोन केला असता त्यांनी तुमची रक्कम थोड्याच दिवसात परत देणार असल्याच सांगितले. परंतू, रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बुधवारी पूर्णगड पोलिस ठाण्यात धाव धेत तक्रार दिली. संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












