मठकरीफाटा येथे बोलेरोची समोरुन येणार्‍या रिक्षेला धडक; रिक्षा चालक जखमी

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे बोलेरो गाडी चालवून समोरुन येणार्‍या रिक्षेला धडक देत अपघात केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 31 मे रोजी सायंकाळी 6.30 वा. ओरी मठकरीफाटा येथे घडली होती.

 

सिध्देश विनायक देसाई (24,रा.ओरी गावठणवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार किशोर जोशी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 31 मे रोजी सिध्देश देसाई आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच-08-एपी-6011) ही जाकादेवी ते ओरी अशी भरधाव वेगाने घेउन जात होता. त्याच सुमारास लहु देवदास जाधव (45,रा.ओरी बौध्दवाडी,रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यु-7757) घेउन समोरुन ओरी ते जाकादेवी जात होते. ही दोन्ही वाहने ओरी मठकरीफाटा येथे आली असता सिध्देशचा तेथील उतारात गाडीवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्‍या रिक्षेला धडक देत हा अपघात केला. या अपघातात रिक्षा चालक लहू जाधव यांना दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.