गणेशोत्सवासाठी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डाला सूचवले पर्याय

खेड (प्रतिनिधी)गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने गावी डेरेदाखल होतात. यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर ताण निर्माण होतो. यापार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासासाठी रेल्वे बोर्डाला काही पर्याय सूचवत रेल्वेगाड्याही दादर, ठाणे स्थानकापर्यंत चालवण्याचा आग्रह धरला आहे.

दिवा-रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी रेल्वेगाडी चालवण्याऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात, या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, आंजणी स्थानकात थांबे द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच या गाड्यांना द्वितीय श्रेणी व चेअर कार कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे ठरत नाहीत. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर व ठाणे स्थानकांपर्यंत चालवणे गरजेचे आहे. चिपळूण-रत्नागिरी दरम्याच्या दिवसा धावणाऱ्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर एस.एल. किंवा थ्री टायर एसी ३ ए डब्यांचे रूपांतर सेकंड सीटिंग २ एस तसेच एसी चेअर कार सीसी कोचमध्ये केल्यास जास्त प्रवाशी प्रवास. करू शकतील. या मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.