लांजा येथील किराणा व्यवसाय दुकानदारावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी) : ५०० रुपयांच्या ५१ नोटा अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात लांजा येथील एका किराणा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद वरेंद्र प्रदीप सुर्वे (वय ३९, राहणार फ्लॅट नंबर ३२, सातवा माळा बिल्डिंग एम-१, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कशिश पार्क ठाणे ) यांनी याबाबतची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. लांजा येथे किराणा व्यावसाय करणारा व्यावसायिक (रा .लांजा खावडकरवाडी) याने दिनांक १५ जून रोजी सकाळी ९.०२ ते ९.०६ या कालावधीत लांजा येथील सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये पाचशे रुपयांच्या ५१ नोटा अशा एकूण २५ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करून बँकेची आर्थिक फसवणूक केली होती.
अशा प्रकारच्या बनावट नोटा असल्याची जाणीव असतानाही त्या स्वतःकडे बाळगून आणि बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये नोटांचा नकली वापर केला म्हणून त्याच्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४८९( ब), ४८९ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. १६ आणि १७ अशा दोन दिवस बँकेला त्यांच्या कामकाजाला सुट्टी असल्याने आज मंगळवारी १८ जून रोजी लांजा पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.









