आ. वैभव नाईक यांनी आमसभा घेऊन जनतेची माफी मागावी

भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर यांचा खोचक सल्ला

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील जनता गेल्या दहा वर्षात मूलभूत विकासापासून वंचित राहिली असून त्याला पूर्णपणे आ. वैभव नाईक जबाबदार असून त्यांनी वास्तव स्थितीचे भान राखून नौटंकी न करता कुडाळ मालवणची अनेक वर्षें प्रलंबित आमसभा घेऊन मतदार संघातील जनतेची माफी मागावी. असा खोचक सल्ला भाजपा जिल्हा प्रवक्ते विष्णू मोंडकर यांनी दिला आहे.

माजी खासदार विनायक राऊत दोन वेळा खासदार झाले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांमुळेच. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील जनतेने ऊबाठा गटाला आणि विनायक राऊत यांना त्यांची योग्य जागा दाखवली आहे. संपूर्ण कोकण महायुती मय झाला असून येणाऱ्या विधानसभेला यांची पुनरावृत्ती होऊन कुडाळ मालवण विधानसभेत वैभव नाईक यांना पराभावाला सामोरे जावे लागणार आहे.

या जोडगोळीने स्वतः मतदार संघाच्या विकासासाठी कुठलेही नियोजनबद्ध काम न करता फक्त दहशत वादाचा खोटा बागुलबुवा करून मतदारांना दिशाहीन करून आपला स्वार्थ साधला. वास्तविक पाहता कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ जिल्ह्यातील तीन विधानसभे पेक्षा सामाजिक आर्थिक व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेला मतदार संघ आहे. या मतदार संघात कुडाळ एमआयडीसी ओद्योगिक क्षेत्र धडपडत आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत. मच्छिमार समाजाचे अनधिकृत पर्सनेट एलईडी या सारखे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक व्यावसायिक शैक्षणिक आर्थिक प्रश्न प्रलंबित आहेत. आंबा काजू बागायतदार यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काही काम झाले नाही. कुडाळ मालवण मधील शालेय मुलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी खेळण्याचे सरकारी मैदान नाही. या मतदार संघातील मालवण, तारकर्ली, वायरी,देवबाग, तोंडवळी सारखे समुद्र किनाऱ्याची ओळख स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी पर्यंटन दृष्टया जागतिक पातळीवर पोचविली असताना आजही हॉटेल, होमस्टे, जलक्रीडा व्यावसायिक यांच्या समोर पर्यटन क्षेत्रात अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. परंतु गेल्या दहा वर्षात आ. वैभव नाईक यांनी हे विषय मार्गी लावण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. मतदार संघात व्यावसायिक आर्थिक उन्नतीसाठी कुठलेही नियोजन किंवा प्रयत्न नाहीत. वास्तविक पाहता वैभव नाईक यांचा उदय खासदार नारायण राणे साहेबांना विरोध करूनच झाला. पण खासदार नारायण राणे साहेब यांनी पंचवीस वर्ष उभ्या केलेल्या कामास अनुसरून तसूभर देखील मतदार संघाचा विकास वैभव नाईक करू शकले नाहीत. मतदार संघाला विकासापासून दूर नेले. एक आमदार म्हणून दहा वर्षांत काय करावे याचाच सूर गमावलेला आमदार जनता अनुभवत आहे.

वैभव नाईक यांना महायुती चे कार्यकर्ते आणि मतदार संघातील मतदार 2024 ला योग्य जागा दाखवतील असेही विष्णू मोंडकर यांनी सांगितले.