शिस्तप्रियव, पारदर्शक आदर्शवत नियोजन!
करड्या निगराणीखाली सिंधुदुर्ग पोलीस भरती सुरू.
सिंधुनगरी : बाळ खडपकर
राज्यात एकाच वेळी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४२ पोलीस पदांच्या भरतीसही बुधवारपासून सुरुवात झाली. ” ज्या” पोलीस अधीक्षकांच्या कारकिर्दीत आपली भरती झाली त्या अधीक्षकां बद्दलचा अभिमान निवड होणाऱ्या नव्या बॅचमधील सर्व पोलिसांना शेवटपर्यंत असतो. तर पारदर्शक आणि काटेकोर भरती प्रक्रिया करून मैदानी व लेखी परीक्षेच्या गुणवत्तेवर त्या त्या पोलीसांना नियुक्त्या दिल्याचा अभिमान खुद्द ही भरती प्रक्रिया राबविऱ्या पोलीस अधीक्षकांना असतो. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनीही हीच भूमिका घेऊन पारदर्शकपणा, कडक निगराणीखाली भरती प्रक्रिया सुरु केली. उमेदवारांची कोणतीच गैरसोय होऊ नये म्हणून प्राधान्य दिले. पोलीस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी चालेल पण उमेदवारांना कोणताच त्रास होणार नाही याची दक्षता घेत केलेले शिस्तप्रिय व पारदर्शक नियोजन तसेच उमेदवारांसाठी दिलेल्या सुविधामुळे आदर्शवत वाटली !
सिंधुनगरी परिसरात गोपनीय पोलिसांचे जाळे, सीसीटीव्ही, ड्रोन व व्हिडिओ कॅमेऱ्याची करडी नजर कडेकोट पोलीस बंदोबस्त अशा कडक निगराणीखाली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील ११८ पोलीस शिपाई आणि २४ चालक मिळून एकूण १४२ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया बुधवार पासून सुरू झाली आहे. या सर्व पदांसाठी ८०४२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. मैदानी आणि लेखी परीक्षे मधून गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांची सिंधुदुर्ग पोलीस म्हणून निवड होणार आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी ५०० पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आले होते. प्रथम शारीरिक पात्रता कागदपत्र पडताळणी मग मैदानी चाचणी ही भरतीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी लावलेली यंत्रणा अत्यंत पारदर्शक व उमेदवारांना कोणताही त्रास न होता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करणारी होती. सिंधुनगरी येथील होमगार्ड कार्यालयाच्या ठिकाणी या भरतीचा नियंत्रण कक्ष व भरती प्रक्रिया कक्ष असलेले मिनी पोलीस प्रशासकीय केंद्र सुरू केले आहे. कागदपत्रांसह उमेदवारांनी या ठिकाणी एन्ट्री केल्यानंतर कागदपत्र पडताळणी, शारीरिक, व त्यानंतर मैदानी चाचणी पूर्ण करून उमेदवार बाहेर पडत होते. प्रत्येक गटात दहा उमेदवार व त्यांच्या नियंत्रणासाठी व मार्गदर्शनासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल देऊन नियोजनबद्ध भरती प्रक्रिया राबवीली जात होती. पोलीस परेड ग्राउंड वर उमेदवारांची मैदानी चाचणी तर १६०० मीटर रनिंग चाचणी जिल्हा रुग्णालय व शासकीय विश्रामधाम मधील मार्गावर होत आहे.
जिल्हा होमगार्ड कार्यालय, पोलीस परेड ग्राउंड रनिंग ट्रॅक जवळजवळ असली तरीही या सर्व उमेदवारांना त्या त्या ठिकाणच्या मैदानी चाचणी पर्यंत पोहोचण्यासाठी सर्व उमेदवारांची वाहन व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उमेदवारांना आपल्या सोबत असलेली बॅग व त्यातील सर्व कागदपत्र सुरक्षित ठेवण्यासाठी एक दालनच पोलीस निगदाने खाली उपलब्ध करून देण्यात आले आहे. ना गडबड ना गोंधळ शांतपणे उमेदवार या भरतीत सामील झाले होते. सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह मोबाईल टॉयलेटची ही व्यवस्था उमेदवारांना पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेसह भरती प्रक्रियेचे काम पूर्ण करण्यासाठी इंटरनेट सुविधा, सुसज्ज कार्यालय, शरीरिक पडताळणीसाठी स्वतंत्र दालन, कागदपत्र पट्टाणीसाठी स्वतंत्र व्यवस्था, काही उमेदवार पासपोर्ट फोटो किंवा कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति विसरून येतात त्यांच्यासाठीही एक फोटोग्राफर व झेरॉक्स मशीन भरतीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांची कोणती दमछाक होत नव्हती. अशा सुंदर व पारदर्शक नियोजनात सिंधुदुर्ग पोलीस भरतीचे काम सुरू झाले आहे. गेले काही दिवस जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधिकारी सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेवाळे व अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या भरतीची घेतलेली मेहनत या नियोजनातून दिसली.
बुधवारी ३०१ जणांची घेतली मैदानी चाचणी. गुरुवारी बोलाविले ७५० उमेदवार : सौरभ कुमार अग्रवाल
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील रिक्त असलेल्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. बुधवार 19 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या पहिल्या दिवशी 500 जणांना बोलविण्यात आले होते. यापैकी 336 जण प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तर 35 जण अपात्र ठरले. यामुळे उर्वरित 301 जणांची बुधवारी शारीरिक चाचणी घेण्यात आली. तर उद्या गुरुवारी अजून 750 उमेदवारांना बोलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस विभागातील तब्बल 142 रिक्त पदांवर सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी मार्चपूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर निवडणुका लागल्याने प्रत्यक्ष भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र आता ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार 19 जून पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झाली असून, 118 पोलीस शिपाई आणि 24 चालक शिपाई अशा एकूण 142 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. आजच्या पहिल्या दिवशी या भरती प्रक्रियेसाठी एकूण 500 उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी 336 एवढे उमेदवार उपस्थित राहिले. यातील 35 जण अपात्र झाले तर उर्वरित 301 एवढ्या उमेदवारांची आज शारीरिक चाचणी घेण्यात आली. सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी झाल्यानंतर मेरिट लिस्ट तयार होईल व त्यानंतर मेरिट लिस्ट प्रमाणे पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्राप्त एकूण 8 हजार 42 अर्जांपैकी प्रत्यक्ष 142 कोणत्या उमेदवारांचा पोलीस भरतीमध्ये समावेश होतो हे समजणार आहे. दरम्यान गुरुवारी 750 उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.
नीटनेटकी व पारदर्शक भरती प्रक्रिया
आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील सर्वात नीटनेटकी आणि पारदर्शक अशी भरती प्रक्रिया होत आहे. पावसाचे दिवस असूनही येणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे, कपडे, बॅगा आदी भिजणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरून येणारे उमेदवार यांची राहण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. पावसामुळे शारीरिक चाचणीत कोणताही अडथळा येऊ नये यासाठीची सर्व काळजी घेण्यात आली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या मात्र असे असले तरीही शारीरिक चाचणी घेताना कोणताही त्रास उमेदवारांना झालेला नाही. त्यांना आवश्यक पाणी, केळी खाण्यासाठी इतर आवश्यक पदार्थ अशांची व्यवस्था ही नीटनेटकी करण्यात आली आहे. यामुळे बुधवारी झालेल्या पोलीस भरतीमध्ये कोणताही गोंधळ किंवा कोणतीही अडचण न येता ही प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली.
कोणतीही अडचण असल्यास इथे संपर्क साधा बाहेरून आलेल्या उमेदवारांची पोलीस हेडकोर्टर,साई माऊली हॉल कसाल, इश्चापूर्ती मंगल कार्यालय,ओरोस,होमगार्ड भवन ओरोस, सुहासिनी मंगल कार्यालय,कसाल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अशा सुमारे साडे आठशे जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.असे सांगतानाच उमेदवारांना कागद पत्रे किंवा अन्य कोणत्याही मदतीची किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर 9421732569,तसेच पोलीस कंट्रोल रूम 02362 228200 येथे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.










