नासाचा अभ्यास दौरा करून जि. प. शाळा शिरवलीचा सुमेद जाधव परतला घरी

शिरवली गावी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत, ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

संतोष कोत्रे | लांजा -: जगविख्यात अंतराळ संशोधन संस्था नासा व अमेरिकेतील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी देऊन माघारी परतलेल्या जि. प. शाळा
शिरवलीचा विद्यार्थी सुमेद सचिन जाधव याचे शिरवली गावी गावकऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

 

रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘जाणू विज्ञान,अनुभवू विज्ञान’ या उपक्रमांतर्गत नासा व इस्त्रो भेट चाचणी परीक्षा असा आदर्शवत उपक्रम राबविला.या परीक्षेतील टॉपर्सना इस्त्रो व नासा भेटीची संधी उपलब्ध करून दिली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील २० टॉपर्स विद्यार्थी या अभ्यासदौऱ्यात निवडले गेले होते. त्यापैकी लांजा तालुक्यातील जि.प.शाळा शिरवलीचा कु. सुमेद सचिन जाधव हा होता. विशेष म्हणजे शिरवली शाळेचा सलग दुसऱ्या वर्षी नासाला गेलेला हा विद्यार्थी.गतवर्षी कु.आशिष अनिल गोबरे हाही विद्यार्थी नासाला जावून आला.शिरवली शाळेची ही सर्वोत्तम कामगिरी कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.

 

५जून ते १८जून असा अभ्यास दौरा करून हे विद्यार्थी रत्नागिरीत परतले. रत्नागिरी येथे या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम्. देवेंद्र सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्वागत करुन संवाद साधला.तसेच लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग व पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी लांजा येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले.
सुमेद जाधव शिरवली गावी पोहोचल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.महिलांनी औंक्षण केले. तर गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत करीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. अभिनंदनाचा वर्षाव झाला. पेढे वाटले गेले. सरपंच तेजिता प्रसन्न राजापकर, शिरवली बौध्दजन विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष विजय जाधव, सचिव सत्यविजय मांडकुलकर, शिरवली बौध्दजन विकास मंडळ (ग्रामीण)चे अध्यक्ष सुरेश जाधव, सचिव विठ्ठल जाधव, माजी सरपंच अन्वर रखांगी, पोलिस पाटील प्रकाश राजापकर, सखाराम जाधव, मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, मार्गदर्शक शिक्षक उमेश केसरकर, श्रद्धा दळवी, संदीप घोरपडे, सुमेदचे आजी आजोबा, आईवडील ग्रामस्थ बहुसंख्येने सहभागी झाले होते.
खेडेगावातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलाला अमेरिकेची संधी मिळाली याबद्दल सुमेधने जिल्हा परिषद रत्नागिरी व मार्गदर्शक शिक्षक, आईवडीलांचे आभार मानले.
सुमेद म्हणाला , नासाला जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो, मला खूप आनंद होतं होता .अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रामधील एटीएक्स प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. यामध्ये अंतराळ स्थानकाची दुरुस्ती, ग्रहावरील खजिनांचा शोध, अंतरायानातून प्रवास, अंतराळात प्रक्षेपण प्रणाली व नियंत्रण कक्षाची अनुभूती घेतली. अंतराळवीरांचा पोशाख, त्यांची वैशिष्ट्ये तसेच विविध उपकरणे याबद्दलची माहिती येथील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. नासा सेंटर येथील रॉकेट गार्डनला भेट देऊन येथील विविध रॉकेट अटलांटिस स्पेस शटल यांची माहिती जाणून घेतली. संवाद साधला.. हे सारे अविस्मरणीय क्षण आहेत.
नासात जायचे असेल तर सर्वात महत्वाचे विज्ञान व खूप धडपड असते.. मला नासामध्ये अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र खूप आवडले. तेथील लोक खूप मेहनत करत होते.मला अभ्यास करून तेथे जायला निश्चितच आवडेल.या साऱ्या प्रवासात मला खूप काही शिकता आले. नवीन नवीन खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळाली. माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे.याचा मला पुढच्या शिक्षणासाठी निश्चितच उपयोग होईल.
ऑरलॅंडो- केनेडी स्पेस सेंटर सह न्यूयाॅर्क मधील स्टॅचू ऑफ लिबर्टी , वर्ल्ड ट्रेड सेंटर ,मॅनहॅटन ब्रिज,लाॅस ऍंजलेसमधील युनिर्वसल स्टुडिओ , सॅन फ्रांसिस्को मधील ॲपल व गुगलचे मुख्य कार्यालय, शहर भ्रमंती करता आली.काही ठिकाणी अमेरिकेतील भारतीय लोक भेटले.त्यांनी चौकशी केली.सोबत फोटोसेशन केले. त्यांनाही आमचा अभिमान वाटत होता.तिथले सारे अनुभव साठवून सुमेद गावी पोहोचला. सातवी इयत्तेतील १३ वर्षाच्या सुमेदचे सारे अनुभव कथन फार बोलके व प्रेरणादायी होते.
अमेरिका प्रगत आहे, निसर्ग संपत्ती ही भरपूर आहे. दुपारचे कडकडीत ऊन असले तरी हवेत गारवा असतो.घामाघूम होणं हा प्रकारच नाही. झोपडपट्ट्या नजरेत पडल्या नाहीत.चकाचक रस्ते, हायफाय गाड्या हे सारं नजरेत भरणारं होतं. खाण्यासाठी पिझ्झा,बर्गर होताच.जेवणात तिखटपणा कमी पण गोडवा जास्त होता.असेही सुमेद गप्पा मारताना दिलखुलासपणे सांगत होता.हे सारं.. एवढं मोठं भाग्य मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाले,असे अभिमानाने आणि आत्मविश्वासपूर्ण नमूद केले.