वेंगुर्ला येथे जागतिक योग दिवस साजरा : नगरपरिषद, सिंधुदुर्ग योग प्रसार संस्‍था व डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी चे आयोजन

 

 

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ला नगरपरिषद, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग योग प्रसार संस्‍था सिंधुदुर्ग व डॉ. वसुधाज योगा अँड फिटनेस अकॅडमी यांच्‍या संयुक्‍त विदयमाने दिनांक २१ जून २०२४ रोजी वेंगुर्ला नगरप‍रिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात जागतिक योग दिवस साजरा करण्‍यात आला. श्रीम. लीना यरनाळकर, मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ, डॉ. वसुधा मोरे, श्रीम. संगीता कुबल व श्री. रामा पोळजी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. तद्नंतर डॉ. वसुधा मोरे व श्रीम. लीना यरनाळकर यांनी आपली मनोगत व्‍यक्‍त केली.

‘जागतिक योग दिवस’ हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. २१ जून २०१५ साली पहिल्यांदा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारावर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो. अलीकडेच सामान्य नागरीकांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढत आहे. सध्‍याच्या धावपळीच्‍या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसना मधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते, असे उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

दरम्यान रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळावे यासाठी सर्वांनी आपल्‍या व्यस्त जीवनशैली मधून किमान १ तास योगासाठी दयावा असे आवाहन यावेळी मुख्‍याधिकारी श्री. परितोष कंकाळ यांनी केले आहे.