
वलौते येथे घरावर वीज कोसळून नुकसान
भिंगळोली येथील ओहाळाचे पाणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक जिकरीची
तुळशी घाटातील रस्त्यावरील दरड बाजूला करण्याच्या कामाला वेग
मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड मध्ये दि.( 21 ) रोजी रात्रीच्या वेळी दमदार बरसलेल्या पावसाने तालुक्यात सरासरी 105 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नागरीकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रात्री झालेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील वलौते गावात संतोष पवार यांचे घरावर विज पडल्याची घटना घडली. यामुळे संतोष पवार व पत्नी सूप्रीया पवार यांना विजेचा झटका लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय मंडणगड येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वीज पडल्याने संतोष पवार यांच्या घराचे अंदाजे 15,500 रुपये इतके नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नोंद कण्यात आली आहे. पंदेरी येथील विजय जाधव यांच्या घराचे पूर्णतः नुकसान झाले, त्यांचे ५० हजार नुकसान झाल्याची पंचनाम्यात नोंद आहे. तळेघर येथील शरद आंजर्लेकर यांच्या घराचे ३५ हजाराचे अंशतः नुकसान झाले आहे. पाट येथील विलास दिवेकर यांच्या घराचे सहा हजाराचे अंशतः नुकसान झाले आहे. पावसामुळे भिंगळोली येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली. हाच ओढा पुढे भिंगळोली समर्थनगर येथून जातो, ओढ्याच्या पाण्यामुळे समर्थनगर येथील घरांभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले व येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने समर्थनगर मधील जनजीवन काही काळ पाण्यामुळे प्रभावित झाले आहे. दरम्यान, दोन दिवसाच्या पावसामुळे तुळशी घाटात रस्त्यावर आलेली दरडी बाजूला करण्याचे काम ( दि. 22 ) रोजीही सुरु होते.
चौकट – कुंबळे – तीडे या मार्गावर भारजा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नवीन मोठा पूल तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पूर्वी असलेला कॉजवे नेहमीच पाण्याखाली जाऊन वाहतूक विस्कळीत होत असे. त्याला पर्याय म्हणून त्याच ठिकाणी अंदाजे सहा कोटी रुपये खर्च करून नवीन पूल बांधून देखील पुलाच्या बाजूने पाणी जात असल्याने नागरिकांनी या पुलाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.








