मालवण | प्रतिनिधी : मालवण मच्छीमार्केट येथे मच्छी साफसफाई करून देणाऱ्या महिलांसाठी असलेल्या शेडची दुरुस्ती तसेच पावसाळी कालावधीत समुद्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्या व पावसापासून संरक्षणासाठीची सुरक्षा व्यवस्था मालवण नगरपरिषद प्रशासनाने अखेर पुर्ण केली आहे. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी व्यवसायिकांच्या वतीने पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मालवण मच्छीमार्केट बाजूला मासे कटिंग व साफसफाई करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शेड मध्ये मासे साफसफाई करणाऱ्या अनेक महिला असतात. या शेडचे छप्पर काही प्रमाणात नादुरुस्त झाले होते. तसेच पावसाळा कालावधीत समुद्राच्या दिशेने येणारे जोरदार वारे व पाऊस याचा विचार करता सुरक्षाव्यवस्था आवश्यक होती. याबाबत व्यवसायिकांच्या मागणी नुसार माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर काम पुर्ण करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने शेडची दुरुस्ती तसेच पावसाळी कालावधीत समुद्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्या व पावसापासून संरक्षणासाठीची सुरक्षा व्यवस्था पुर्ण केल्याने दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच महेश परब, सोनाली हळदणकर, मंदार केळूसकर, मिथुन शिगले आदी अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले. तसेच या जनहिताच्या कामी जयमाला मयेकर यांचाही पाठपुरावा महत्वाचा ठरला. असे सांगत दीपक पाटकर यांनी सांगितले.












