गोठ्यात घुसून बिबट्याचा वासरावर हल्ला वासराचा मृत्यू 

 

तालुक्यातील आगवे ब्राह्मणवाडीतील घटना 

लांजा (प्रतिनिधी ) रात्रीच्या सुमारास घरालगतच्या गोठ्यात घुसून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री तालुक्यातील आगवे ब्राह्मणवाडी येथे घडली आहे.

आगवे ब्राह्मणवाडी येथील प्रभाकर मुळे यांचा घरालगतच गुरांचा गोठा आहे..मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यातील वासरावर हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्यात वासराचा मृत्यू झाला आहे. तर अन्य गुरे मात्र बचावली आहेत. रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने बिबट्याने केलेल्या हल्ल्याची माहिती मुळे यांना कळली नाही. आज बुधवारी सकाळी गोठ्यात गेल्यानंतर त्यांना बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबतची माहिती त्यांनी लांजा वनविभागाचे वनपाल दिलीप आरेकर यांना दिली असून या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.