विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करिअरला दिशा देण्यासाठी करावा- पो. उपनिरिक्षक श्रीमती भारती धनेश्वर

 

नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ वी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

राजापूर (वार्ताहर): चांगल्या सवयी, योग्य व्यक्तीशी मैत्री आणि सातत्यपूर्ण अभ्यास या त्रिसुत्रीचा आयुष्यात वापर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून केल्यास जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन राजापूर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्रीम. भारती धनेश्वर यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ वी च्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर संस्था अध्यक्ष सुलतान ठाकूर, उपाध्यक्ष निजाम काझी, सचिव मजीद पन्हळेकर, सदस्य असलम कोंडकर, नझीर टोले, प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने आदी मान्यवर उपस्थित होते.,

पुढे बोलताना श्रीमती धनेश्वर यांनी सांगीतले की विद्यार्थ्यांनी गांभीर्याने करिअरची निवड करावी, मोबाईलचा वापर फक्त करिअरला दिशा देण्यासाठी करावा, व्यसनांपासून दूर रहावे, सोशल मिडीयाचा सावधानतेने वापर करावा तसेच शालेय जीवानापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संस्था सचिव मजीद पन्हळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादनाबरोबर सजगतेतून सभोवतालच्या पर्यावरणातून शिकत रहावे असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रशालेचे प्राचार्य राजेंदकुमार व्हनमाने यांनी प्रशालेच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला व शिस्त, कठोर परिश्रम आणि मनातील उत्साह याव्दारे विद्यार्थ्यांनी यशाचे उच्च शिखर गाठावे असे सांगीतले. यावेळी इंडियन टॅलेंट सर्च स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी, शिक्षक यांचाही मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला .

कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुरआने पाक माविया शेख या विद्यार्थ्याने आली. पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीम. ज्ञानदा आसोलकर यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. श्रीमती प्रितम सुर्वे यांनी तर आभार प्रा. स्मिता तेली यांनी मानले.

———-