डॉ. अभिजित व डॉ. सौ. रश्मी सावंत यांची माहिती
चिपळूण (प्रतिनिधी):– शहरातील श्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत आय.सी.यू. दालनाचा शुभारंभ दि. ३० जून रोजी होणार आहे. चिंचनाका येथील प्राईम सेंटरमध्ये हे रुग्णालय असून आय.सी.यू. कक्षाचे उद्घाटन आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव, यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. सदानंद चव्हाण, रमेश कदम, ज्येष्ठ डॉ. रत्नाकर घाणेकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप पाटील, प्रशांत यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहाणार आहेत. या संदर्भात बोलताना डॉ. अभिजीत सावंत म्हणाले, आपण गेली चौदा वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहोत. कोंढे येथे आपण वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर चिपळूणमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण चालवित आहोत. स्त्री रोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, मूळव्याध अशा विविध प्रकारच्या रुग्णांवर येथे उपचार होतात. आता अद्ययावत आयसीयू सुरू करण्यात आला असून या ठिकाणी बारा अद्ययावत आयसीयू असतील. ३० बेडचे हे रुग्णालय असून या ठिकाणी चोवीस तास आयसीयू सुरू राहाणार आहे.
कोरोना काळात केलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची आयसीयू सुरू करण्याची मागणी होती. त्यानुसार आपण रुग्णांसाठी ही सेवा देणार आहोत. या बरोबरच दोन डायलेसिस बेडदेखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. लवकरच या रुग्णालयात विविध शासकीय योजना देखील लागू केल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत सर्व कंपन्यांची विमा सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे. रुग्णांना दर्जेदार आणि माफक दरात वैद्यकीय सुविधा मिळावी, हा आपला उद्देश असून त्या माध्यमातून रुग्णसेवा केली जाणार आहे. या ठिकाणी हृदयरोगावर चोवीस तास सेवा उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी एम. डी. मेडीसिन डॉ. भीमराव पवार हे सेवा देणार आहेत. त्याच पद्धतीने इको या सुविधा देखील उपलब्ध असतील. रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अभिजीत सावंत, डॉ. सौ. रश्मी सावंत यांनी केले आहे.











