साळशी- सरमळेवाडी येथे गवारेड्याकडून भातपिकाचे नुकसान  

 

 

भात लावणीस आलेल्या रोपांची मोठ्याप्रमाणावर नासधूस 

शिरगाव ( प्रतिनिधी)  देवगड तालुक्यातील साळशी- सरमळेवाडी येथे शेती करीत असलेले शेतकरी शांताराम रावले,वैभव घाडी,मनोज नाईक यांची लावणीस आलेली योग्य भातरोपे ( तरवा) गवारेड्याने खावून , पायदळी तुडवून टाकली व नासधूस केली.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

हे गवारेडे कळपाने फिरत असून सध्या काजू- आंबा हंगाम संपला असल्यामुळे ते शेतीकडे वळले आहेत. सरमळेवाडी येथील शेतातील भातलावणीस आलेली योग्य भातरोपे ( तरवा) गुरुवारी रात्रीच्या वेळेस गवारेड्यानी हि भातरोपे खाऊन फस्त केली.तसेच या शेतीत उलट- सुलट फिरुन भातरोपे पायदळी तुडवून भातपिकाची मोठ्याप्रमाणावर नासधूस केली. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

या वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रव्यामुळे अनेक शेतक-यांनी शेती करावयाची सोडली आहे.

दरम्यान नुकसान झालेल्या शेतीची वनरक्षक निलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला.

तरी या वन्यप्राणांचा बंदोबस्त करावा अशी शेतक-यांतून मागणी होत आहे.