२४ लाखांची ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पोलिसांकडून ए. आरके व्यवस्थापकाचा शोध

 

खेड(प्रतिनिधी) शहरातील एका तरुणास २४ लाख ८५ रुपयांचा ऑनलाईन गंडा हजार घातल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नीरज जांगरा या भामट्यास जेरबंद केल्यानंतर त्याच्या अनेक कारनाम्यांचे रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. फसवणुकीतील रक्कम ज्या ए. आरके कंपनीत गुंतवली, त्या व्यवस्थापकाचाही पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. या व्यवस्थापकाच्या अटकेनंतर अनेकांना बेड्या पडण्याची शक्यता असल्याचेही समजते.

ए. आरके कंपनीत रक्कम गुंतवून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अटकेतील भामट्याने शहरातील एका तरुणास २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. १९ ते २४ मे या कालावधीत घडलेल्या घटनेदरम्यान तरुणाच्या विविध खात्यातून जमा केलेली रक्कम त्याने ४३ बँक खात्यांत वळवून पुढे २२ वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवण्याचा प्रताप केला होता. याशिवाय फसवणुकीतील ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम चंढीगड व जोधपूर येथील एटीएमचा वापर करून काढल्याची कबुली भामट्याने पोलिसांना दिली आहे. तरुणाकडून विविध खात्यातून जमा केलेली रक्कम त्याने ए. आरके कंपनीत जमा
केल्याची कबुली पोलिसांना दिल्याचे समजते. यामुळे ए. आरके कंपनी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधार असण्याची दाट शक्यता असून कंपनी व्यवस्थापकाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

या फसवणूक प्रकरणाचे मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपास गतिमान केला आहे. भामट्याचे मुंबईसह नवी मुंबईतील कारनामे उघड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ए. आरके कंपनीच्या व्यवस्थापकाचाही शोध सुरू असून यात आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार पोलीस फसवणूकप्रकरणी साऱ्या शक्यतांचा पडताळा करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अन्य पोलीस अधिकारयांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. नितीन भोयर अधिक तपास करत आहेत.