राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा सरचिटणीस अजित यशवंतराव यांच्या प्रयत्नांना यश
लांजा (प्रतिनिधी ) शहरातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तथा सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक (ऑपरेशन्स) अरविंद भडीकर यांची नुकतीच भेट घेतली.
दरम्यान, उपळे-वीरगाव या ठिकाणी आरडीएसएस योजनेअंतर्गत 33/11 केव्ही चे नवीन उपकेंद्र प्रस्तावित केले असल्याची माहिती त्यांनी दिल्याने अजित यशवंतराव यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून लांजा शहरात अपुर्या दाबाने होणार्या विद्युत पुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारीवर्ग हैराण झाले आहेत. अनियमित वीजपुरवठ्याचा फटका शहरातील व्यापारी, लघुउद्योजक, बँकिंग कामकाज आणि शेतकरी वर्गाला अधिक प्रमाणात बसत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या लांजा येथील कार्यालयास धडक दिली होती. यावेळी लांजा शहरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्र उभारण्याची गरज असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अजित यशवंतराव यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन केले होते.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणाच्या संबंधित विभागाला सदर उपकेंद्र उभारणीसाठी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने अजित यशवंतराव यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक (ऑपरेशन्स) अरविंद भडीकर यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी अजित यशवंतराव यांनी योजने अंतर्गत उपळे-वीरगाव विद्युत उपकेंद्र तातडीने उभारण्याचे काम मंजूर करून या कामाची युद्धपातळीवर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे श्री. भडीकर यांच्याकडे केली. त्यांच्या या निवेदनाची तात्काळ दखल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घेताना महावितरणाचे मुख्य अभियंता (वितरण विभाग) यांनी उपळे-वीरगाव, ता.लांजा या ठिकाणी आरडीएसएस योजनेअंतर्गत 33/11 केव्ही चे नवीन उपकेंद्र प्रस्तावित केले असल्याचे अजित यशवंतराव यांच्या कार्यालयास लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे लांजा येथील प्रस्तावित नवीन उपकेंद्राची उभारणी दृष्टीक्षेपात आली आहे. सदर उपकेंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून काम सुरू होईल यासाठी पुढेही आपला पाठपुरावा सुरू राहील अशी माहिती अजित यशवंतराव यांनी सांगितले .











