शिरवली शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठच

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शिरवली नं.१ प्राथमिक शाळेत सोमवारपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट होण्याची चिन्हे निर्माण झालेली असतानाच ग्रामस्थांची बैठक न झाल्याने निर्णय लांबणीवर पडला. यामुळे  शाळा भरलीच नाही. चार शिक्षकं वगळता विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे.

 

 

इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग असलेल्या व २८ पटसंख्या असलेल्या शिरवली नं.१ शाळेच्या वर्गखोल्यांचे छत कोसळल्याची घटना घडल्यापासून विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडली आहे. जोपर्यंत शाळेच्या वर्गखोल्याची दुरूस्ती
होवून अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यंत शाळेत एकही पाल्य पाठवणार नसल्याची आक्रमक भूमिका ग्रामस्थ व पालकांनी घेतल्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाची कोंडी झाली आहे.

 

 

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची सुरक्षित वर्गखोल्यांसह मुख्याध्यापकांचे दालन, शाळेचा व्हरांडा याठिकाणी बैठक व्यवस्था करण्याचा निर्णय घेत सोमवारपासून शाळा सुरू होईल, असे संकेत दिले होते. ग्रामपंचायतीमार्फत कोसळलेल्या छताची कौले काढण्याचा निर्णय देखील घेतला होता. तसेच लगतच्या विद्यालयाने देखील एक वर्गखोली देण्याची तयारी दर्शवली होती. यामुळे गेल्या ५ दिवसापासून बंद असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट होण्याच्या शक्यतेने शिक्षण विभागाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र शनिवारी होणारी ग्रामस्थांची बैठक न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय झाला गेले नसल्याने विद्यार्थी शाळेकडे नाहीत. याबाबत सरपंच परशुराम कुळे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामस्थांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.