करुळ घाटात दरड कोसळली

मुसळधार पावसाचा घाटमार्गाला फटका: दरड कोसळण्याची मालिका सुरूच

वैभववाडी प्रतिनिधी
करूळ घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी रात्री पायरी घाट नजीक भला मोठा दरडीचा भाग रस्त्यावर कोसळला आहे. रस्ता सद्यस्थितीत वाहतुकीसाठी बंद असल्याने कोणताही अडथळा नाही. संबंधित यंत्रणेने दरड बाजूला केली आहे.

करूळ घाट मार्ग रुंदीकरण काम सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस घाटमार्गातील अडचणी वाढत आहेत. दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने मार्ग चालू करण्याबाबत प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात घाटातील संरक्षक भिंत व रस्ता वाहून गेला होता. तसेच सद्यस्थितीत पावसाचे पाणी गटारातून जात नसल्यामुळे संरक्षक भिंतीत पाणी मुरत आहे. याचा फटका देखील भविष्यात या मार्गाला बसण्याची शक्यता आहे.