आमदार शेखर निकम यांच्या वन विभागाला सूचना
चिपळूण (प्रतिनिधी);– चिपळूणमधील नागरिकांना मगरींपासून भयमुक्त ठेवण्यासाठी अतिवृष्टी, महापूर काळात वनविभागाने अलर्ट मोडवर रहावे, अशा सुचना आ. शेखर निकम यांनी वनविभागाला सुचना केल्या. तर माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या वन विभागाच्या उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत निषेध केला.
काही दिवसांपूर्वी शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त संचार झाल्याचे पहाव्यास मिळाले. तसेच शिवनदी परिसर अथवा शहरांमधील तळ्यांमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी या मगरींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांच्यासह चिपळूणमधील नागरिकांनी वन विभागाकडे काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे केली होती.
याच अनुषंगाने आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने तहसीलदार कार्यालयात शनिवारी बैठक झाली. यावेळी आमदार निकम यांच्यासह प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगरसेवक किशोर रेडीज, उदय ओतारी, निखिल पवार आदी उपस्थित होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी प्रास्ताविकात गेल्या काही दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त संचार आढळून आला. तसेच शहरांमधील तळ्यांमध्ये देखील मगरींचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरींचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने वन विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाला वन विभागाने प्रतिसाद न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर आमदार शेखर निकम यांनी याविषयी बैठक लावल्याबद्दल निकम यांचे आभार मानले. तर चिपळूणमधील नागरिकांना मगरींपासून वनविभागाने भयमुक्त करावे, असे आवाहन यावेळी केले.
या अनुषंगाने चर्चा होताना शिवनदीत चिकन, मटन टाकाऊ अवशेष नदीत टाकले जातात. या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दंडात्मक कारवाईत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली. तलावातून अथवा नदीपात्रातून ज्या ठिकाणी मगरी बाहेर येतात, अशा ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याबाबत चर्चा झाली. यावर मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आपले मनोगत मांडताना असहमती दर्शवली.
नैसर्गिक अधिवासातील मगरींना पकडता येत नाही. मात्र, मोकळ्या जागेत असल्यास या मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते, अशी माहिती वन विभागाचे वन सहाय्यक संरक्षक वैभव बोराटे यांनी दिली. तसेच काही दिवसांपूर्वी शंकरवाडी मुरादपुर येथे मोकळ्या जागेत आलेल्या मगरींना पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या ठेवण्यात आले असल्याचे देखील यावेळी बोराटे यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले.
चिपळूणमधील नागरिकांना मगरींपासून भयमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने वन विभाग व चिपळूण नगरपरिषद यांच्यात समन्वय होण्याच्या दृष्टीने व्हाट्सअपग्रुप करूया असे म्हणणे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी यावेळी मांडले. तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर नागरिकांसाठी उपलब्ध राहतील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सांगितले.
तर आमदार शेखर निकम यांनी चिपळूणमधील नागरिकांना मगरींपासून भयमुक्त ठेवण्यासाठी वन विभागाने अलर्ट मोडवर राहावे, अशा सूचना देताना तळ्यातील मगरींचे नदीत स्थलांतर करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही यावेळी दिली.











