एका वृद्धेचा समावेश : मुसळधार पावसामुळे हुमरमळा ओरोस परिसरात जलमय स्थिती
अमित खोत | मालवण : मुसळधार पावसामुळे हुमरमळा ओरोस परिसरात जलमय स्थिती निर्माण झाली. अनेकजण पाण्यात अडकले. यावेळी प्रशासन व मालवण आपत्कालीन ग्रुपने त्या ठिकाणी पोहचत पाण्यात अडकलेल्या 20 जणांना सुखरूप बाहेर काढले. यात एका वृद्धेचाही समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवीवारी मुसळधार पावसाने कहर केला. धो धो कोसळलेल्या पावसाने काही ठिकाणी जनजिवन विस्कळीत बनले. अनेक ठिकाणी पाणी घुसल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाली. मुंबई गोवा महामार्गवरील कुडाळ हुमरमाळा परिसरात मोठया प्रमाणात पाणी वाढले. यावेळी शेतात काम करणारे 15 शेतकरी अडकून पडले. तर ओरोस फाटा या ठिकाणी काही घराच्या चारही बाजूने पाणी वाढल्याने एका वृद्धेसह काही व्यक्ती अडकून होत्या.
दरम्यान प्रशासकीय आपत्कालीन यंत्रणा व मालवण येथील आपत्कालीन ग्रुप त्या ठिकाणी पोहचले. बचावं कार्यासाठी होडी व सुरक्षा साहित्य आणण्यात आले. पाण्यात अडकलेल्या 15 शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच एका घरात अडकून पडलेल्या आज्जीला तसेच एका घरात अडकलेल्या चार सदस्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बचाव पथक मध्ये मालवण येथील आपत्कालीन ग्रुपचे दामू तोडणकर, रोहित आडकर, संकेत जाधव, चेतन मोंडकर, यश देसाई, ओंकार देवूलकर, नितीन तोडणकर, गणेश पांगे, सिद्धेश कदम, महेश, सुमित मांजरेकर, साहिल कुबल, संकेत जाधव, हर्ष बांदकर सहभागी होते. आपत्कालीन स्थितीत जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहणार असल्याचे दामू तोडणकर यांनी माहिती देताना सांगितले.












