तालुक्यातील चार प्रमुख मार्ग पाण्याखाली : वाहतूक ठप्प
अनेक घरांमध्ये घुसले पुराचे पाणी : मोठे नुकसान
दोन जिल्ह्यांना जोडणारा तिथवलीतील सर्वात उंच जामदापूल गेला पाण्याखाली
वैभववाडी
वैभववाडी तालुक्यात रविवारी दिवसभर अक्षरशः ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पडलेल्या पावसाने सर्वत्र आहांकार माजवला. अतिवृष्टीत तिथवली नाऊळदेवाडी येथील विमल आत्माराम कुडाळकर यांचे घर कोसळले आहे. तर तालुक्यात अनेक घरामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. वैभववाडी – नावळे मार्ग, वैभववाडी – उंबर्डे मार्ग, वेंगसर – मौंदे, कुसुर – दिगशी आदी प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ हक्क झाली झाली आहे. या पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटालाही बसला आहे. भुईवाडा घाटात काही प्रमाणात पडझड झाली आहे. परंतु वाहतूक सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणारा तिथवली येथील सर्वात उंच असलेला जामदापुल पाण्याखाली गेला आहे.
वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शाळा, कॉलेज व शासकीय कार्यालयांना रविवार सुट्टी होती. अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागला असता. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वैभववाडी – नावळे मार्गावर शहरातील वार्ड क्रमांक 12 मध्ये पावसाचे पाणी आले. नजीकच्या संदीप पाटील, रवींद्र पाटील व शिर्के, अशोक पाटील यांच्या घरात पाणी घुसले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वैभववाडी – उंबर्डे मार्गावर सोनाळी वाणीवाडी, सोनाळी अभिनय विद्या मंदिर व कुसुर बौद्धवाडी अशा तीन ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वेंगसर ते मौंदे मार्गावर डांबर प्लांट नजीक वहाळाचे पाणी घुसल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कुसुर – तिथवली मार्गावर दिगशी नजीक काॅजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

तिथवली गावंधरवाडी येथील शौकत कासम सोलकर यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. तसेच गांधरवाडीतील निसार भाटकर यांच्या घरात देखील पाणी घुसले आहे. तिथवली नाऊळदेवाडी येथील विमल आत्माराम कुडाळकर यांचे घर अतिवृष्टीत कोसळून नुकसान झाले आहे. एडगांव येथील ब्रिज, तिरवडे येथील ब्रिज, भुईबावडा येथील ब्रिज, कुसुर येथील ब्रिज, करुळ खडकवाडी व गावठणवाडी येथील ब्रिज असे अनेक ब्रिज पाण्याखाली गेल्याने गावातील व वाड्यावाड्यातील संपर्क तुटला आहे. सोनाळी वाणीवाडी येथील सुभाष जगन्नाथ पाटील यांच्या घरात पुराचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील सुख, शांती, गोठणा, अरुणा आदी प्रमुख नद्या आज दिवसभर दुथडी भरून वाहत आहेत. अरुणा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने अरुणा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सतर्कतेचा इशारा नदी काठच्या गावांना देण्यात आला आहे. या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान मिळाली आहे. नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे धान्य, वस्तूंचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.












