दुचाकी एसटीला धडक; दुचाकी चालक जखमी

रत्नागिरी | प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्‍या एसटीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 4 जुलै रोजी सायंकाळी 4.15 वा.गयाळवाडी फाट्याच्या अलीकडे घडली होती.

सचिन मधुकर वाडकर (39,रा.गयाळवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल महेंद्र खापरे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित सचिन वाडकर हा आपल्या ताब्यातील अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच-08-एआर-1308) ही रत्नागिरी ते हातखंबा जाणार्‍या रस्त्याने घेउन जात होता. त्याच सुमारास (एमएच-14-बीटी-2535) ही एसटी समोरुन येत होती. ही दोन्ही वाहने खेडशी गयाळवाडी फाट्याच्या अलीकडे आली असता सचिन वाडकरचा त्याच्या दुचाकीवरील ताबा सूटला. त्यामुळे दुचाकीने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्‍या या एसटीला धडक देत हा अपघात केला. यात सचिन वाडकरला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे नुकसानही झाले आहे.