मालवणच्या सुपुत्राचे राजापुरात साहसी सेवाकर्तव्य

 

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग यांची पुराच्या पाण्यात ही तत्पर सेवा : आपत्ती व्यवस्थापन रत्नागिरी नौका विभाग येथे कार्यरत

अमित खोत | मालवण : आपत्ती व्यवस्थापन रत्नागिरी नौका विभाग येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग राजपुर येथे पुराच्या पाण्यात प्रसंगी पोहत जाऊन तत्परपणे साहसी सेवाकर्तव्य बजावत आहेत.

मुसळधार राजापूर येथे अर्जुना नदीला महापूर आला. शिळगाव पावसकरवाडी व उन्हाळी मोंडवाडी या दोन्ही गावांना जोडणारे वीज खांब व तारा पुराच्या प्रवाहामुळे वाहून गेली. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये पाच दिवस विद्युत प्रवाह खंडित झाला होता. प्रशासन व त्या गावातील ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन नौका विभागला मदतीसाठी पाचारण केले. नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही गावाची पाहणी केली असता पाण्याचा जोरदार प्रवाह व अडथळे लक्षात घेता आपत्कालीन बोट अर्जुना नदीत उतरवणे धोक्याचे होते. त्यामुळे प्रकाश सारंग यांनी अर्जुना नदी पोहून पार करत व
करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन्ही गावांना जोडणारी विद्युत वाहिनी दोरीला बांधून ती दोरी घेऊन अर्जुना नदी सारंग यांनी पोहून पार केली. एमएसईबी राजापूर विभाग इंजिनिअर सनी पवार, वायरमन अक्षय भेरे, अभिनंदन सातोसे, लाईनमन मनोज पाटकर यांनी वीज जोडणी पुर्ण करत वीज पुरवठा सूरू करत
दोन्ही गावांचा खंडित झालेला विद्युत प्रवाह जोडून देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.

उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग यांच्या धाडसी सेवाकार्य बजावताना आपत्ती व्यवस्थापन नौका विभाग रत्नागिरी टीम सहाय्यक पो. उपनिरीक्षक पोपट शिंदे, सहाय्यक पो. उपनिरीक्षक सुनील येलके, पोलीस ठाणे राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांसह पोलीस शिपाई सचिन वीर, राजापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत भोसले व त्यांचे सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

चार दिवसांपूर्वी राजापूर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार नागरिकांना प्रकाश सारंग व सहकारी यांनी सुखरूप बाहेर काढले होते. महाराष्ट्र सागरी किनाऱ्यावर सेवा बजावत असताना या पूर्वीही त्यांनी अनेकवेळा साहसी पद्धतीने सेवाकार्य बजावले आहे.