सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी एड बेरोजगारांना संधी द्या!

सिंधुनगरी / प्रतिनीधी

जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर गुरुवारी जिल्ह्यातील सर्व डीएड बेरोजगार आंदोलनासाठी एकवटले आहेत. शिक्षकांच्या रिक्त राहिलेल्या जागांवर स्थानिक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्य द्यावे यासह अन्य १३ मागण्यासाठी एकजूट दाखवली आहे. जोपर्यंत प्रशासन आपल्या मागण्या मान्य करत नाहीत तो पर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचे सांगत ‘आर या पार’ चा संघर्ष सुरू केला आहे.

सकाळी ११ वाजल्यापासून डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष विजय फाले व सचिव सहदेव पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून स्थानिक शिक्षक भरती आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागातील बेरोजगार उमेदवार दाखल झाले आहेत. महिलांची संख्या लक्षवेधी होती. विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. दरम्यान शिक्षक समिती चे नेते भाई चव्हाण, चंद्रसेन पाताडे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देत पाठिंबा दर्शविला.
जिल्ह्यात शेकडो उमेदवार पदविका घेऊन बेरोजगार आहेत. वयोमर्यादा संपत चालली आहे. जिल्ह्यात शिक्षकांची १३०० पदे रिक्त होती. त्यातून ५१३ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. २०५ उमेदवारांची यादी प्रतीक्षेत आहे. नियुक्ती झालेले ९५ टक्के उमेदवार हे परजिल्ह्यातील आहेत. अजूनही ६०० पदे भरायची आहेत या जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी प्रमुख मागणी आहे.

मागण्या..!
स्थानिक डीएड पदविका धारक बेरोजगारांना डीएड पदविका गुणवत्ता मेरिटवर शिक्षण सेवक म्हणून सरसकट नियुक्त मिळाव्यात. शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांना जिल्ह्याचे डोंगरी निकष ओळखून खास बाब म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा. राज्यस्तरीय भरती प्रक्रिया रद्द करून कोकण विभाग निवड मंडळ यावर भरती करण्यात यावी. पर जिल्ह्यातील शिक्षकांची बोलीभाषा भिन्न असल्यामुळे बालकांना अध्यापनात अडचणी येतात त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. पर जिल्ह्यातील शिक्षक किंवा नोकरीसाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात येतात आणि तीन वर्षे झाली की सोयीनुसार आपल्या जिल्ह्यात परत बदली करून घेतात. परिणामी शिक्षक पद रिक्त राहिल्याने बऱ्याच शाळा बंद पडल्या आहेत त्यामुळे गावातील शाळांची पटसंख्या या बाबींमुळे घसरल्याचे दिसून येत आहे. दहा हजार लोकांनी टीईटी बोगस पर प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाले आहे हे सर्वच विद्यार्थी पर जिल्ह्यातील आहेत. अजूनही अशी प्रकरणे दिवसागणित बाहेर पडताना दिसत आहेत त्यामुळे या परीक्षेबाबत विश्वासहर्ता राहिलेले नाही. पोर्टलचे धोरण तत्काळ रद्द करावे व डीएड मेरिट वर पुन्हा भरती करावी अशी मागणी केली आहे.

सूचना फलक लक्षवेधी ..!
आंदोलन कर्त्यांच्या हातात अनेक लक्षवेधी सूचना फलक होते. शाळा आमची पोरा आमची शिक्षक कीत्या भायालो, निवृत्त शिक्षक परत हवेत तर आम्ही का नको?, नको टी ई टी नको टी ए आय टी भरती आमची व्यावी थेट, स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा सूचनांचा उल्लेख करण्यात आला होता .