निवेदिता प्रतिष्ठान जालगांव, सरस्वती विद्यामंदिर जालगांव दापोली आगार चा संयुक्त उपक्रम….
दापोली :- गेले वर्षभर निवेदिता प्रतिष्ठान आणि एसटी आगार दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी मधील व स्थानकावरील कचरा पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्याचा सातत्यपूर्ण यशस्वी प्रकल्प सुरू आहे.
या प्रकल्पाला दापोलीमधील शाळा व महाविद्यालयांचे सदोदित सहकार्य लाभत आहे.
या सातत्यपूर्ण कार्यक्रमानुसार दिनांक ११ जुलै रोजी सरस्वती विद्यामंदिर च्या सहकार्याने प्रवाशांनी प्रवास करताना एसटीत टाकलेल्या सुमारे साडेतीन हजार बाटल्या निवेदिता प्रतिष्ठान च्या जालगाव येथील संकलन केंद्रात जमा करण्यात आल्या.
या बाटल्या यंत्रणेमार्फत आगारात प्रती दिन एका बाजूला जमा केल्या जातात व तीन महिन्यांतून एकदा निवेदिता प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवल्या जातात.
तसेच गाडीत व स्थानकावरील रॅपर्स चा (खाऊचा) कचरा देखील संस्थेतर्फेच पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवला जातो.
११ जुलै रोजी झालेल्या प्लास्टीक बाॅटल कलेक्शन प्रोग्रॅम मध्ये सरस्वती विद्यामंदिर चे विद्यार्थी मुख्याध्यापिका सारिका गुजराथी ,पंकज तुळपुळे सर आणि पल्लवी दाबके मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संकलन कार्यात निवेदिता प्रतिष्ठान चे ज्येष्ठ सदस्य रमेश जोशी,साटम,महेश्वरी विचारे ,विद्याधर ताम्हणार ,सुनील चव्हाण,निवेदिता परांजपे,वैभवी सागवेकर ,प्रमोद रसाळ आणि अध्यक्ष प्रशांत परांजपे,आगार प्रमुख रेश्मा मधाळे,अधीक्षक मुनाफ राजापकर,प्रणव रेळेकर ,एसटीचे अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग लाभला.
गेल्या वर्षभरात एसटीतील प्रवाशांनी प्रवास करताना एसटीत टाकलेल्या सुमारे दहा हजार पेक्षा अधिक बाटल्या पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात यश आल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली.











