किर्लोस आणि भगवंतगड बंधारा पाण्याखाली
मसूरे | झुंजार पेडणेकर : शनिवारी रात्रीपासून अविश्रांत बरसणाऱ्या पावसाने ‘धो डाला’ अशी परिस्थिती मसूरे पंचक्रोशी मध्ये निर्माण झाली आहे. गडनदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकिनारी असलेल्या भात शेतीमध्ये पुन्हा एकदा पुराचे पाणी गेल्यामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. तसेच विजेचा लपंडाव सुद्धा चालू झाल्याने मसूरेतील बिएसएनएल मोबाइल नेटवर्क विस्कळीत झाले आहे. गड नदीपात्रावरील गोठणे आणि किर्लोस या दोन गावांना जोडणारा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. बांदिवडे आणि भगवंतगड जोडणारा कॉजवे सुद्धा पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुद्धा बंद झाली आहे. वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी म्हणजे आज सुद्धा पावसाची संतत धार चालू राहिल्यास गड नदी पात्राबाहेर वाहण्यास वेळ लागणार नाही.












