तिला वाचविण्याचे अनेकांचे शर्तीचे प्रयत्न ठरले निष्फळ

कोदवली साईनगर भागात अडलेली गाभण गाय.
गाभण गोमातेच्या मृत्युने सारेच हळहळे!

राजापूर (वार्ताहर): रस्त्याच्या कडेला एक गाभण गाय अडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्राणीप्रेमी नागरिकांनी धाव घेतली. तिला मोकळे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यानी केले. मात्र निष्ठूर नियतीच्या पुढे दोन तासांचे शर्तीचे प्रयत्न्ही निष्पळ ठरले. वासरू पोटातच मृत झाले होते. मात्र असह्य वेदनेने काही वेळातच गायीनेही आपले प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना बुधवारी कोदवली साईनगर भागात घडली. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत गायीला वाचविण्यासाठी मदतीला धाऊन जाणाऱ्या आणि शर्थीच्या प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्राणीप्रेमी नागरिकांचे कौतुक होत आहे.

बुधवारी आषाढी एकादशीची लगबग सुरू असताना सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आय डी बी आय बॅक जवळील बॉक्स सेल (बोगदा) जवळ एक गाभण गाय अडल्याची माहिती येथील छायाचित्रकार प्रदिप कोळेकर यांना मिळाली. त्यांनी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभात किनरे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती देवून घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत घटनास्थळी डॉ. संतोष गोरे, वैभव हेलगंड, सुरज जोगी, विजय उगले, नरेंद्र गोंडाळ, माजी पं.स.सदस्य हरिभाऊ गुरव, सौ.ज्योती शिंदे, सौ.दिपाली बावधनकर, तळगांवकर आदी मंडळी जमा झाली. डॉ. किनरे ही पोहचले.

निर्विकारपणे ती जमिनीवर पडली होती. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होताच ती थरथरली अन् गर्भारपणाचा भार पेलत बसती झाली. गाईची सोडवणूक करताना लक्षात आले वासरु पोटातच जाऊन चौवीस तासांहून अधिक काळ झालाय. त्यामुळे मृत वासराला बाहेर काढून गायीला वाचविण्यासाठी सर्वांनी गाईला मोकळे करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. सर्वांचे नाना प्रकारे शर्थीचे प्रयत्न सुरुच होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह उपस्थीतांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न केले परंतू गाई पासून वासरु दुर करता आले नाही. अखेर नियतीलाही दया आली नाही. गाईने देखील पराकोटीच्या वेदना सहन करत असह्य होऊन शेवटी आपला प्राण सोडला.

गोमातेची दोन तासांची प्राणांतीक झुंज उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांचे डोळे भरून आले. मन विषण्ण झाले. जन्म देणारी प्रत्येक माता किती महान असते, सहनशीलतेची पराकोटोची ताकद तिच्यात असते म्हणूनच आपण हे जग पाहू शकतो याची प्रचिती यावेळी उपस्थितांना आली. गोमातेपुढे नतमस्तक होत अतिशय जड अंतःकरणाने गाईला मालकाच्या हवाली करत उपस्थितांनी निरोप घेतला.