सिंधुनगरी प्रतिनिधी
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग नगरी लगतच्या ओरोस ख्रिश्चनवाडी येथील महामार्गालगच्या घरामध्ये पुन्हा शुक्रवारी सकाळी पाणी घुसले. यावेळी मात्र महसूल यंत्रणा अलर्ट मोडवर होती. तातडीने तहसीलदार उपविभागीय अधिकारी वा एनडीआरएफ टीम दाखल झाली. पाणी घुसलेल्या घरातील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आता पाऊस विसरला असून पाण्याचा प्रवाह कमी होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने मागील तीन तासात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला होता.
मागील पुरात येथील नागरिकांची वाहने पुराच्या पाण्यात अडकली होती. यावेळी मात्र या नागरिकांनी आपापली वाहने पाणी घुसण्यापूर्वीच महामार्गावर आणून ठेवली होती. महामार्गावरील पीठ ढवळ नदीला पूर आल्यामुळे या परिसरात पाणी घुसून वाडीतील घरे पाण्याखाली जातात. याच पाण्यामुळे जिजामाता सर्कल ते वर्दे या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग हे काही काळ बंद झाला होता. या मार्गावर अनेक निवासी वसाहती व बंगलोज आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.











