शासनाकडून तातडीची चार लाख रुपये आर्थिक मदत कुटुंबीयांना सुपूर्द
तहसीलदार ओंकार ओतारी यांची माहिती
परुळे : प्रतिनिधी
चिपी भरणीवाडी येथील रहिवासी पांडुरंग दशरथ वाक्कर वय ५० वर्ष हे सोमवारी तेथीलच ओहोळाला आलेल्या पुराच्या पाण्यात पाय घसरून पडून वाहून गेल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाती मृत्यू बाबत प्रशासनाच्या तत्पर्ते मुळे त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून अवघ्या चार दिवसात तातडीची ४ लाख रुपयांची आर्थिक मदत तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आली.
यावेळी तलाठी दिगंबर डवरे, कोतवाल आर वरक तसेच संदीप परब आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार ओतारी यांनी कुटुंबीयां चे सांत्वन केले. पांडुरंग वाक्कर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते कामाला गेले होते .तेथून ते दुपारी आपल्या घरी यायला निघाले होते .पावसाचा जोर जास्त असल्याने त्यांच्या घरापासून साधारणता एक किलोमीटर अंतरावर ओहोळ आहे. या ओहोळातून येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पुराच्या पाण्यातून वाहून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने घरातील मंडळींकडून त्यांची शोधा शोध सुरू झाली. त्यांच्या घरापासून दोनशे मीटरच्या अंतरावर ओहोळामध्ये ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह आढळून आला. याची खबर निवती पोलीस स्टेशनला देताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच हवालदार पंढरीनाथ भाबंरे यांनी पोलिस नाईक दीपक गावडे तसेच होमगार्ड ओमकार सर्वेकर यांच्या मदतीने पंचनामा केला. व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पांडुरंग वाक्कर यांचा मृतदेह रात्री उशिरा ओरोस येथील शवगृहात ठेवण्यात आला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.वस्त यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी,भाऊ व अन्य असा परिवार आहे. पांडुरंग हे आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होते. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत त्यांच्या या अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात होती.त्यामुळे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी सर्व प्रशासकीय बाब पूर्ण करून आज तातडीने या कुटुंबीयांकडे शासनाची आर्थिक मदत पोहोच केली.










