आंबोली घाटाच्या दरीत कोसळली पर्यटकांची कार
कार झाडाला अडकल्याने पर्यटक बचावले
आंबोली पोलिसांनी अंधारातही केले मदतकार्य
आंबोली । प्रतिनिधी : आंबोली घाटात दरड कोसळणाऱ्या वळणाच्यालगत शुक्रवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील पर्यटकांची कार गाडी खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने ही कार दरीतील झाडाला अडकल्याने आतील प्रवासी बचावले. दरम्यान, त्यांनी १०० नंबर वर फोन करून माहिती दिल्यानंतर आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्ता देसाई व कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी त्याठिकाणी जाऊन घाटात खाली अडकलेल्या ५ प्रवाशांना वर आणले. रात्रीच्या वेळी काळोखात प्रवासी अडकले होते. तरीही अंधरातून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत केली आणि आंबोलीत आणले. याबाबत संबंधित पर्यटकांनी पोलिसांचे आभार मानले.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी अभी कांबळे, राजेश नाईक दीपक
शिंदे व मनीष शिंदे आदींनी त्या ठिकाणी घाटात पडलेली
गाडी बाहेर काढली. परंतु या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही असे सांगण्यात आले.











