माठेवाडा येथील सासोलकर अपघातापासून थोडक्यात बचावले
सावंतवाडी : सावंतवाडी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून पादचाऱ्यांबरोबर दुचाकी स्वारांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. माठेवाडा येथील लक्ष्मीकांत सासोलकर या ५० वर्षीय नागरीकाचा अक्षरशः १५ हून अधिक कुत्र्यांनी पाठलाग केला. यावेळी त्यांनी मोठ्या शिताफीने तेथून भरधाव दुचाकी चालवून ते या हल्ल्यातून बचावले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
लक्ष्मीकांत सासोलकर हे दुपारी माठेवाडा येथील आपल्या घराकडून पोलीस लाईन जवळील आपल्या गॅरेजकडे जात होते. रस्त्यावरून जात असताना शहरातीला उभा बाजार येथील डुबळे यांच्या घरासमोरील रस्त्यावरून ते दुचाकीवरून जात असताना त्यांच्या पाठीमागे दोन्ही बाजूला सुमारे १५ हून अधिक भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. कुत्रे पाठीमागून धावत येत असल्याचे पाहून त्यानी आपले दोन्ही पाय वर उचलून अक्षरश : दुचाकीच्या हँडल पर्यंत आणले आणि वेगाने दुचाकी चालवून आपला जीव कसा बसा वाचवला. तरी दोन्ही बाजूनी हे कुत्रे वंजारी यांच्या घरापर्यंत धावत आले होते.
दरम्यान, या भटक्या कुत्र्यांचा पालिकेकडून बंदोबस्त होत नसल्यानेच जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकी स्वारांवर हल्ला करत असल्याचा आरोप सासोलकर यांनी केला असून तात्काळ याबाबतची तक्रार सावंतवाडी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडे दिली आहे. तसेच त्यांनी पोलीस स्थानकातही याबाबतची सूचना दिली आहे.
पोलिसांनी याबाबतची तक्रार नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडे करा असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सासोलकर यांनी सावंतवाडी नगर परिषदेच्या लँडलाईन नंबर वरून कॉल करून याबाबतची तक्रार दिली असता भटक्या कुत्र्यांनी तुमचा पाठलाग करताना तुमच्या दुचाकीला अपघात झाल्याची घटना घडली असेल तरच आम्ही तक्रार घेतो अशा प्रकारचे संतापजनक उत्तर दिल्याने सासोलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना आणि दुचाकी स्वारांना याचा प्रत्यय आला असून नगरपरिषद प्रशासन याबाबत ठोस कारवाई का करत नाही असा सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.









