अडूर | वार्ताहर ; मागील दोन दिवस तालुक्यात जोरदार वादळी वारे आणि काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात अडूर गावातील बौद्धवाडी येथील प्रकाश रामचंद्र जाधव यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून नुकसान झाले.
गेले काही दिवस पावसाने जोरदार मुसुंडी मारलेली असताना दि.२२ जुलै रोजी पावसाने थोडी विश्रांती घेतलेली दिसून आली. मात्र रात्री ८.३० च्या दरम्यान जोरदारपणे आलेल्या वादळी वारा आणि पाऊस यामध्ये मोठी हानी झालेली पाहायला मिळते. अडूर बौद्धवाडी येथील प्रकाश रामचंद्र जाधव यांच्या घरावर आंब्याची फांदी कोसळून घराची पडझड होऊन किमान सोळा सिमेंट पत्रे फुटले आणि घरात पाणी शिरलेले दिसून येते. या घटनेत घरातील मंडळींना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र जोरदार आवाज होऊन आंब्याची फांदी घरावर कोसळल्याने काही काळ घबराटीचे वातावरण होते.












