शिक्षक समन्वय संघाची मागणी
माखजन |वार्ताहर : महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा १ जून २०२४ पासून दिला जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिवेशनात लक्षवेधी ला उत्तर देताना केली होती.या घोषणेला अनुसरून शासन निर्णय निर्गमित करावा व आचारसंहितेपुर्वी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा करावा यासाठी शिक्षक समन्वय संघाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली.
यावेळी अॅड तुकाराम शिंदे, यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट झाली.
मुंबई बालभवन या ठिकाणी उच्च माध्यमिक कमवि शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी प्रा अनिल परदेशी,प्रा कर्तारसिंग ठाकूर,किशोर हिरे,उपस्थित होते.
यावेळी शिक्षणमंत्री यांनी शिक्षकांच्या मनासारखा शासन निंर्णय दिला जाईल असा विश्वास उपस्थित शिक्षकांना दिला.
दरम्यान उपस्थित शिक्षकांनी राज्यभर सुरू असलेल्या विविध संघटनांच्या व शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले.वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा नैसर्गिक टप्पा वाढीने मिळावा व अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासन निर्णय व्हावा व आचारसंहितेपुर्वी शिक्षकांच्या खात्यात पगार जमा व्हावा यासाठी शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक प्रा दीपक कुलकर्णी,प्रा रविकांत जोजरे,ज्ञानेश चव्हाण परभणी येथील साई जन्मभूमी पाथरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत.याच ठिकाणी अन्य शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू आहे.शिवाय या मागणी साठी नांदेड,अकोला,हिंगोली,जालना,कोल्हापूर आदी व अन्य जिल्ह्यात धरणे आंदोलन केली जात आहेत.
शासनाने शिक्षकांचा अंत न पाहता शासन निर्णय निर्गमित करून तात्काळ अनुदान वितरणाचा आदेश काढावा अशी मागणी केली जात आहे.












