प्रशासनावर कोणाचा दबाव ? तहसीलदारांना सवाल

संदीप गावडे आक्रमक ; गेळे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच

सिंधूनगरी : प्रशासनावर कोणाचा दबाव आहे? एका व्यक्तीच्या हट्टा पायी जमीन वाटप केली जात नाही. त्या व्यक्तीला आम्ही पुरून उरू असा इशारा गेळे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या संदीप गावडे यांनी प्रशासनाला दिला. सर्वे नंबर १९ आणि २० पासुन तत्काळ वाटप सूरू करा अशी मागणी उपोषण स्थळी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली. मात्र या प्रश्नाला निरुत्तर होउन तहसीलदार श्रीधर पाटील परतले.

गेळे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबुलायदार जमीन वाटपासाठी आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषण करते संदीप गावडे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी बोलताना संदीप गावडे म्हणाले, उद्यापासून सर्वे नंबर १९ आणि २० पासुन सर्व जागेची मोजणी करून तात्काळ वाटप करण्यास सुरुवात करा त्यानंतर आरक्षणाचा विषय घ्या असे संदीप गावडे यांनी सांगितले. जोपर्यंत यावर ठोस निर्णय घेत तोपर्यंत येथून हलणार नाही. एका व्यक्तीच्या हट्टा पायी जो घाट घालण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे त्या व्यक्तीला आम्ही पुरून उरू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असतानाही प्रशासन वाटप का करत नाही असा जाब त्यांनी तहसीलदारांना विचारला. पोट हिस्से करायला आपण का घाबरत आहात? आपल्यावर कोणाचा दबाव आहे ते आम्हाला माहीत आहे. संदीप गावडे यांचा उत्तर नसल्याने तहसीलदार श्रीधर पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात परत गेले.

जोपर्यंत गावकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर मागे हटणार नाही असा इशारा उपस्थितांनी दिला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, तुकाराम बंड, देवसू सरपंच रूपेश सावंत, श्रीकृष्ण गवस आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित आहेत.