UNESCO : आसामचे ‘मोइदम्स’ जागतिक वारसा यादीत;’युनेस्को’च्या बैठकीत निर्णय; अहोम राजघराण्यातील दफन व्यवस्थेचा गौरव

वी दिल्ली : आसाममधील अहोम राजघराण्याच्या ‘मोइदम्स’ या दफन संरचनेचा जागतिक स्तरावर गौरव झाला असून ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत आज त्यांचा समावेश करण्यात आला.

ईशान्य भारतातील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणारा हा पहिलाच सांस्कृतिक वारसा ठरला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या भारतातच सुरू असलेल्या ४६ व्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी भारतातर्फे २०२३-२४ च्या जागतिक वारसा यादीसाठी ‘मोइदम्स’ चे नामांकन करण्यात आले होते.

काय आहे मोईदम्स?

इजिप्तमधील पिरॅमिडसारखी आसाममधील ‘मोइदम्स’ ही अनोखी संरचना आहे. सुमारे ६०० वर्षांपूर्वी आसामवर राज्य करणाऱ्या अहोम राजघराण्यातील सदस्यांच्या मृत्यूनंतर मोइदम्समध्ये प्रिय वस्तूंसह त्यांचे दफन करण्यात येत असे. अहोमची पहिली राजधानी चराईदेवमध्ये मोइदम्स आढळतात. यात प्रामुख्याने तीन विभाग असून पहिल्या दुमजली विभागात प्रवेशासाठी कमानीचा रस्ता असतो.

या विभागाला झाकणाऱ्या अर्धगोलाकार असलेल्या मातीच्या टेकडीवर विटा व मातींची संरचना आहे. मोईदम्सचा पायाची भिंत बहुभुजाकृती असून पश्चिमेला कमानीचे मजबूत प्रवेशद्वार आहे. प्रत्येक कक्षात मध्यवर्ती ठिकाणी मृतदेह ठेवण्यासाठी जागा आहे. राजघराण्यातील मृत व्यक्तीबरोबर त्याने वापरलेले सोन्याचे दागिने, हस्तिदंत, कपडे, शस्त्रे आदींचेही दफन केले जात असे. मोईदम्सचा आकार छोट्या टेकडीपासून मोठ्या पहाडापर्यंत आहे. ही टेकडी वनस्पतींनी झाकलेली असते.

युनेस्कोच्या या निर्णयाचे स्वागत करताना हा दिवस सुवर्णाअक्षरांनी लिहिण्यासारखा असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटले आहे. ‘मोइदम्स’चे वैश्विक मूल्य लक्षात घेतल्याबद्दलही त्यांनी जागतिक वारसा समितीचे आभार मानले. समितीची बैठक दिल्लीतील भारत मंडपममध्ये २१ तारखेपासून सुरू झाली असून ती ३१ जुलैपर्यंत असेल. जगभरातील जागतिक वारसा यादीसाठी २७ नामांकनांची तपासणी केली जाणार आहे. युनेस्कोच्या या समितीची महत्त्वाची बैठक प्रथमच भारतात होत आहे.

आसाममधील मोइदम्सचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश होण्याची बाब भारतासाठी अत्यंत आनंदाची व गौरवाची आहे. चराईदेव येथील मोइदम्समधून आसामची पूर्वजांना आदर देणारी गौरवशाली अहोम संस्कृती प्रतिबिंबित होते. अहोम राजवट व संस्कृतीबद्दल अधिकाधिक लोक जाणून घेतील, अशी आशा आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान